होमपेज › Konkan › छत्रपतींचा चुकीचा इतिहास सांगणार्‍यांना वेळीच ठेचा : आ. नितेश राणे

छत्रपतींचा चुकीचा इतिहास सांगणार्‍यांना वेळीच ठेचा : आ. नितेश राणे

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:43PMमालवण : प्रतिनिधी

ज्या शिवछत्रपतींच्या नावाने, विचारांनी घडलो त्या महाराजांचा इतिहास सांगून प्रत्येक पिढी घडविण्याचे काम आम्ही करीत आहोत. मात्र, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समाजासमोर मांडला जात आहे.  महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे  कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर कोणत्याही कायद्याची पर्वा न करता त्याला तेथेच शिक्षा देण्याचे काम शिवभक्‍तांनी केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे सर्वस्व आहेत. त्यामुळे महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारी विकृती शिवभक्‍तांनी वेळीच ठेचून  काढली पाहिजे, असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे केले. 

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर अखिल भारतीय शिवछत्रपती जन्मोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती सोहळा हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, शिवशाही गाणी, भगवे फेटे, झेंडे, मर्दानी खेळ तसेच शिवज्योत मशालींनी, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण किल्ला तसेच मालवणनगरी शिवमय झाल्याचे दिसून आले. आ. नितेश राणे यांच्यासह सौ. नंदिता राणे, सौ. मेघा गांगण, सायली वंजारी, वैशाली शंकरदास, शिल्पा खोत, चारुशीला आचरेकर इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत, सचिन तोडकर, महाराष्ट्र स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाळू कोळंबकर, मोहन वराडकर, नगरसेवक यतीन खोत, सुदेश आचरेकर, अशोक चव्हाण, भाई मांजरेकर, राजू बिडये, अभय कदम यांच्यासह शेकडो शिवप्रेमी, महिलांनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. आ. राणे यांच्या हस्ते शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह अर्पण करण्यात आले. यानंतर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा जयघोषात पार पडला. यानंतर शिवराजेश्‍वर मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्यासह अन्य किल्ला रहिवाशांचा आ. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   

आ. राणे म्हणाले, आज शिवभक्‍त, शिवप्रेमींची व्याख्या बदलली आहे. जो शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतो. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराजांना नाव ठेवतो त्याला शिवभक्‍त म्हणून ओळखले जाते. त्यामुळे खरा शिवभक्‍त कसा असतो, त्याचे विचार काय असतात हे सर्वांनी जनतेसमोर आणले पाहिजे. महाराजांचा खोटा इतिहास पुढे आणणार्‍यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरविले जाते, अशी टीका त्यांनी केली.   अन्य महापुरुषांच्या दोन जयंत्या साजर्‍या करायला दिल्या जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वस्व आहेत, आमच्यासाठी महापुरुष आहेत. त्यामुळे आमच्या देवाबद्दल पसरविली  जाणारी विकृती शिवभक्‍तांनी हाणून पाडायला हव्यात.

काही नियम हे मराठ्यांसाठीच असतात. अन्य महापुरुषांबद्दल कोण अपमान करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना मानणारा समाज, नागरिक हा कुठलाही विचार न करता माझ्या महापुरूषाची बदनामी तुम्ही कशी करता, असे विचारत त्या विरोधात कोणत्याही टोकाला जाण्याची त्याची तयारी असते. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्याबद्दल विकृत लिखाण, इतिहास सांगितला जात आहे. चुकीचा इतिहास सांगून काहीजण स्वतःला शिवभक्‍त म्हणवित आहे. अशा प्रवृत्तींविरोधात सर्व शिवभक्‍तांनी कडवटपणा आणण्याची गरज आहे.