Mon, Jun 24, 2019 17:31होमपेज › Konkan › रेल्वेतील जेवण आता महागणार

रेल्वेतील जेवण आता महागणार

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 9:28PMअलिबाग :

रेल्वे प्रवासात खाण्यावर ताव मारणे आता सांभाळून करावे लागणार आहे. देशातील सर्वांत मोठे नेटवर्क आणि दूरच्या प्रवासासाठी स्वस्त, असा पर्याय असलेल्या रेल्वेतील जेवण मात्र महागणार आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान मिळणार्‍या खान-पानासाठी आता जास्त जीएसटी भरावा लागणार आहे. प्रवासादरम्यान रेल्वेडब्यात विकल्या जाणार्‍या खाद्य-पेयांवर यापुढे 18 टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. 

केंद्र सरकारकडून आतापर्यंत या खाद्य-पेयांवर सवलतीच्या दरात 5 टक्के जीएसटी लावण्यात येत होता. पण रेल्वे ही वाहतुकीचे साधन असून कँटिन अथवा रेस्टॉरेंट रेल्वेला मानता येणार नसल्यामुळे अशा खाद्य-पेयांवर पूर्ण 18 टक्के जीएसटी लागेल. ही सेवा नसल्यामुळे ही विक्री/वस्तू पुरवठा जीएसटीच्या पूर्ण दरास पात्र राहणार आहे. आऊटडोअर कॅटरिंगद्वारे यापूर्वी पुरविल्या जाणार्‍या खाद्य-पेयांवर 18 टक्के व कँटिनमधील खाद्यपेयांवर 5 टक्के जीएसटी लावण्याची तरतूद होती. पण रेल्वेला पुरवठा होणार्‍या या खाद्य-पेयांवरही सवलतीच्या 5 टक्के दरात जीएसटी लागेल, असे परिपत्रक केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने काढले होते. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या प्रत्येक पदार्थांवर वेगवेगळा जीएसटी दर लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे तसेच थंड किंवा गरम करून सामानाच्या विक्रीवरही टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. जी कंपनी रेल्वेला सामान पुरवेल त्यांनाही 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. लांबच्या प्रवासामध्ये रेल्वेतील अन्न विकत घेण्याशिवाय प्रवाशांना कुठलाही पर्याय राहत नाही. अशावेळी अन्नाची वाढलेली किंमत प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणार आहे.अनेक रेल्वेगाड्यांमध्ये तसेच रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा दर्जा फारसा चांगला नसल्याचे दिसून आले आहे. गुणवत्तायुक्त अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने होत असतात.