होमपेज › Konkan › कासार्डेतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार!

कासार्डेतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार!

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:03PMकासार्डे  ः वार्ताहर

आज जगात सर्वत्र महिलांचा गुणगौरव करणारा, महिलांना  सन्मानित करण्याचा दिवस  म्हणजे  8 मार्च हा जागतिक महिला दिन  म्हणून साजरा होत असताना कणकवली तालुक्यातील  कासार्डे गावच्या महिलांना आपल्या  गावात  सुरू असलेली बीअर बार, अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी  आक्रमक पवित्रा घेतला.

कासार्डे ग्रामपंचायतीने दारू विक्रीसंदर्भात आयोजित ग्रामसभेला महिलांनी सकाळपासून तुफान गर्दी केली होती. गावातील 22 वाड्यातील महिलांनी मिळेल त्या वाहनांनी ग्रामसभेला हजेरी लावण्यासाठी हातात दारूबंदीचे फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मतदार ओळख पटविल्यानंतर खर्‍या अर्थाने ग्रामसभेला सुरुवात झाली. 

 ग्रामसभेला हजारो लोक उपस्थित राहणार याची कल्पना असूनही ग्रा.पं.ने केलेल्या ढिसाळ नियोजनाचा नाहक त्रास ग्रामस्थाना सहन करावा लागला. बहुसंख्येने आलेल्या मतदारांना बैठक व्यवस्था अपुरी असल्याने काही पुरूष ग्रामस्थांना ताटकळत उभे राहून  ग्रामसभा पूर्ण करावी लागली.  प्रारंभी उपस्थितीत ग्रामस्थांचे  पं. स. सदस्य  प्रकाश पारकर यांनी  स्वागत करून सभेची सुरुवात केली.
सरपंच बाळाराम तानवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला  उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडळकर, पंचायत समितीचे निरीक्षक श्री. पवार, पोलिस अधिकारी तसेच जि.प.सदस्य संजय देसाई, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, दारूबंदी समिती अध्यक्षा सौ. पूजा जाधव, सर्व ग्रा.पं. सदस्य,  तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, पोलिसपाटील महेंद्र देवरूखकर, माजी जि.प सदस्या सौ. सुप्रिया पाताडे,  सौ.मानसी वाळवे,  यांचासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संजय पाताडे, संजय दत्ताराम पाताडे यांनी  ग्रामस्थांच्यावतीने भूमिका मांडताना आजची सभा ही वेळेत अजेंडा न फिरणे, शिमगोत्सवाच्या काळात सभा लावणे, सभा ठिकाण गैरसोयीचे असणे अशा अनेक मुद्द्यावर  नियमानुसार बेकायदेशीर असल्याची मुद्दा मांडला.  गावात दारूविक्री बंद व्हावी ही  ग्रामस्थांची आग्रही मागणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावर सरपंच बाळाराम तानवडे यांनी गावाने जी भूमिका घेतली आहे ती शासन निर्णयानुसार योग्य तो पाठपुरावा करून दारूबंदी  मागणी पूर्ण करण्याचा आश्‍वासन त्यांनी ग्रामसभेला दिले.  तसेच जागा मालकांनाही ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन कासार्डे गावात बिअर बारसाठी जागा देऊ नये साठी प्रयत्न करण्यासाठी आठ दिवसांची मुदत ग्रामसभेकडून घेतली . 

 आपल्याला अपेक्षित असलेले निर्णयच स्थानिक स्वराज्य संस्था घेईल अशी भूमिका जि.प. सदस्य संजय देसाई यांनी मांडली. माजी जि.प सदस्या सौ. सुप्रिया पाताडे, सौ.मानसी वाळवे यांनी ही गाव हितासाठी व विकासासाठी गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. 

यावर शासनाची भूमिका मांडताना एकूण मतदाराच्या 50 टक्के मतदार उपस्थित न राहिल्याने ही सभा तहकूब करावी लागत आहे.गावाचा हा प्रयत्न जरी अयशस्वी झाला तरी  पुढे जर गावातील एकूण महिला मतदारांपैकी 25 टक्के महिलांनी लेखी सहीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली तर आणि जिल्हाधिकारी मार्फत निवडून होईल व त्यात जर 50 टक्के महिला उपस्थित राहिल्या आणि  त्यातून जर बहुमताने दारूबंदी बाबत मतदारांनी कौल दिला तर निश्‍चितच दारूबंदी होवू शकेल, अशी माहित त्यांनी सभेला देत मार्गदर्शन केले. 

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडळकर यांनी  बिअरबार संदर्भात असलेल्या नियमाबाबत  दिलेल्या उत्तरावर मात्र ग्रामस्थांनी ना पसंती दर्शविली. शेवटी शासनाची भूमिका व  नियम काहीही असो,  कासार्डे गावात दारूबंदी झालीच पाहिजे ही आग्रही भूमिका सौ. दर्शना पाताडे यांनी माडून सदरचे बिअरशॉपी व  दारूविक्री बंद करण्याबाबत  आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा यावेळी दिला. 

सभेला एकूण   852 मतदार उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी ही कायदेशीर विषयावर ग्रामसभेला विशेष मार्गदर्शन केले.