Wed, Jul 17, 2019 20:55होमपेज › Konkan › खासदारांच्या दत्तक गावात होणार ‘दारूबंदी’

खासदारांच्या दत्तक गावात होणार ‘दारूबंदी’

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:01PMआरवली : वार्ताहर

बुरंबाड ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण पिढीजात दारुबंदीचा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सरपंच मनोज शिंदे यांनी दिली. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला दारु धंद्याच्या मुद्यावर कमालीच्या आक्रमक झाल्या. अखेर दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. खा. विनायक राऊत यांनी बुरंबाड गाव आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले असल्याने दारुबंदी निर्णयाला महत्त्व आले आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील बुरंबाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच मनोज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येंनी उपस्थित होेते. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी भुसारी यांनी सर्वांचे स्वागत केले. 

मागील सभेचे इतिवृत्त वाचून इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली. चौदावा वित्त आयोग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच विविध विकासकामे, शिक्षण, आरोग्य, दूरध्वनी, महावितरण व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील वर्षात झालेल्या विकास कामांबाबत ग्रामसभेत समाधान व्यक्‍त करण्यात आले. गेली अनेक वर्षे बुरंबाड गावात दारुधंदे सुरु होते. दारुधंदे बंद करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महिला वर्गाने दारुधंद्यांचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला.  सरपंच मनोज शिंदे तसेच उपस्थित ग्रामस्थ महिलांच्या दारुबंदी मागणीला पाठिंबा देत संपूर्ण गावात दारुबंदीचा ठराव मांडण्यात आला. एकमताने ठराव संमत करण्यात आल्याने महिला वर्गाने एकच जल्लोष केला. ग्रामसभेला उपसरपंच संजय शिंदे, माजी सभापती नम्रता कवळकर,  स्मिता शिगवण, सविता कवळकर, प्रतिभा चव्हाण, मानसी मोभारकर, रेवती गोरिवले आदींसह ग्रामस्थ, शिक्षण, आरोग्य सविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.गावाची एकी झाली आणि दारूबंदीचा ठराव झाला. त्यामुळे आता गावात दारूबंदी होणार आहे.