Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Konkan › ऐरोलीत बनणार राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय 

ऐरोलीत बनणार राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय 

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 9:16PMऐरोली : वार्ताहर 

वन विभागाकडून ऐरोलीमध्ये उभारण्यात आलेल्या किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्राच्या प्रदर्शनाला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता ऐरोलीत राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्याचे वनविभागाच्या कांदळवन कक्षाने ठरवले आहे. या संग्रहालयात सागरी परिक्षेत्रात आढळणार्‍या समुद्री जीवांचे अवशेष प्रदर्शनसाठी ठेवले जाणार आहेत.

संशोधन आणि प्रदर्शन अशा उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती करण्याचे वन विभागाच्या कांदळवन संरक्षण कक्षाने ठरविले आहे. किनारपट्टीवरील खारफुटींच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून कांदळवन संरक्षण कक्षाची निर्मिती झाली आहे. या कक्षाने खारफुटी संरक्षणाबरोबरच सागरी जीवांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. राज्याच्या किनारपट्टीवर जखमी किंवा मृतावस्थेत वाहून येणार्‍या सागरी जीवांच्या संवर्धनाचे काम कांदळवन संरक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. अलिकडे किनार्‍यावर मृतावस्थेत वाहून येणार्‍या सागरी जीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये समुद्री कासवांपासून ब्ल्यू व्हेल माशांचा ही समावेश आहे. अशा जीवांना किनारपट्टीवर वन विभागाच्या कर्मचांर्‍याकडून  दफन करण्यात येत आहे. 

उरणच्या केगाव समुद्रकिनार्‍यावर मृतावस्थेत महाकाय ब्ल्यू व्हेल मासा वाहून आला होता. विशेष मोहीम राबवून त्या माशाचे मांस उरणच्या खाडीत पुरण्यात आले, तर या माशाचा  सांगाडा ऐरोलीच्या सागरी जैवविविधता केंद्रात ठेवला आहे. विविध किनार्‍यांवर दफन करण्यात आलेल्या सागरी जीवांचे अवशेष  बाहेर काढून त्यांना एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याचा विचार कांदळवन संरक्षण कक्ष करीत आहे. यासाठी ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राच्या आवारामध्ये जायन्ट ऑफ दी सी  या संकल्पनेवर आधारित सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. सागरी जीवांच्या  संग्रहालयाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोटे यांनी सांगितले. दफन केलेले सांगाडे बाहेर काढून ठेवणार जुहू किनार्‍यावर 2016 साली दफन झालेला देवमासा, उरणमधून आणण्यात आलेला ब्ल्यू व्हेलचा सांगाडा, सागरी किनारपट्ट्यात  वसई, पालघर आणि ऐरोली केंद्रामध्ये दफन करण्यात आलेले डॉल्फिन आणि समुद्री कासावांचे सांगडे बाहेर काढून संग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे बोटे यांनी सांगितले. उरण येथील देवमाशांच्या सांगड्यांचे काही अवयव हे तुटलेले आहेत. तर मांस काढत असताना काही अवयव हे गहाळ झाले आहेत. या माशांच्या सांगड्यातील गहाळ झालेले अवयव हे कृत्रिम बसवण्यात येणार आहेत. या ब्ल्यू व्हेल माशांना कशा पद्धतीने प्रदर्शनासाठी ठेवायचे यावर विचार सुरू आहे. तर माशांचा सांगाडा खुल्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्याला कुठल्याही प्रकारचे आवरण ठेवण्यात येणार नाही. असे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोटे यांनी सांगितले.