Wed, Apr 24, 2019 20:10होमपेज › Konkan › प्रभाते मनी : निश्‍चित ध्येय 

प्रभाते मनी : निश्‍चित ध्येय 

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:40PM
रत्नागिरी : अमोल डोंगरे

यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे ध्येयाचा निश्‍चितपणा. आपल्याला काय पाहिजे याचे स्पष्ट ज्ञान असणे म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. एखादी  व्यक्‍ती प्रचंड यशस्वी झालेली पाहून आपण प्रभावित होतो. यशस्वी व्यक्‍ती अनेक अडचणींना, अपयशांना सामोरी जाते. आपण फक्‍त यश पाहतो पण त्याचे परिश्रम पाहत नाही. जगात असे हजारो लोक आहेत ज्यांना अनेक अडचणींना, कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागले. ज्याची कल्पनाही करणं कठीण आहे.  तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. 

नेमके काय करायचे आहे हे माहीत असल्याशिवाय यश मिळणार कसे? निश्‍चित ध्येयच समोर नसेल तर जाणार  कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे? समुद्र प्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळेच समोर ते इच्छित ठिकाण दिसत जरी  नसले तरी त्या दिशेने जहाज प्रवास करीत राहते आणि अखेर आपल्या मुक्‍कामी पोहोचते. आपले ध्येय निश्‍चित करणे ही ध्येयप्राप्तीची सुरुवात आहे. एकदा तुम्ही ध्येय ठरवले की त्या दिशेने स्वतःला झोकून द्या. त्या वेडाने स्वतःला, आपल्या मनाला व्यापून टाका. बर्‍याच ठिकाणी आपले ध्येय लिहून ठेवा. नेहमी डोळ्यांसमोर ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपल्या इच्छाशक्‍तीवर आधारित आहे.

आपले ध्येय हेच आपले जग होऊन जायला पाहिजे. कोणतेही आणि कितीही मोठे यश असू दे, त्याचा आरंभ बिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निर्णय. ज्या क्षणी तुम्ही तुमचे ध्येय निश्‍चित करून ते कागदावर लिहून घेता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेपणा अनुभवता. स्वतःवर स्वतःचे नियंत्रण असल्याची जाणीव होते. ही जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे.ध्येय न ठरवता उगाचच रस्ता जातोय म्हणून त्या रस्त्याने चालत राहणे हे मूर्खपणाचे आहे. हा रस्ता कुठे चाललाय हे तेव्हाच कळणार जेव्हा आपणाला आपले इच्छित ध्येय माहिती असेल. खूप वेळेला असे दिसून येते की आपण केलेले संकल्प हे केवळ स्वप्नवत राहतात. आपण ते पूर्ण करण्यासाठी निश्‍चयी नसतो. आपण केलेले संकल्प आपण नेहमी व्यक्‍त केले पाहिजेत. नेमक्या शब्दांत त्यांची मांडणी करून स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजेत. त्या द‍ृष्टीने प्रयत्न करून नेमक्या एवढ्या एवढ्या दिवसात मला संकल्प पूर्ण करायचे आहेत, असे ठरवले पाहिजे. संभ्रमात न राहता आपल्या कृतींना निश्‍चित दिशा देऊन वेळेचा व आपल्या शक्‍तीचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. आपण निश्‍चित केलेल्या ध्येयावर ठामपणे राहणे व त्याचे टप्पे (पायर्‍या ) तयार करून एक एक पायरी चढून जाणे महत्त्वाचे ठरते. तेव्हाच ठरवलेले ध्येय आपल्याला अशक्य वाटणार नाही. उलट ते आपल्या आवाक्यात असल्यासारखे वाटून सकारात्मकता तयार होईल. या सकारात्मक विचारांतून न थांबता अविरतपणे त्याच्यावर काम करत राहिले पाहिजे.
आपल्याला काय मिळवायचे आहे, याचे भान असणे आवश्यक आहे. कृती केल्याशिवाय ध्येयप्राप्ती अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगली योजना बनवलीत पण कार्यच केलं नाही तर काहीही निष्पन्न होणार नाही. यश प्राप्तीसाठी आवश्यकता आहे ती पहिल्या पावलाची. एकदा का गती प्राप्त झाली की आपोआपच पाहिल्या क्रियेमधूनच दुसरी मोठी क्रिया निर्माण होते. परंतु, यासाठी चालढकल करण्याची सवय सोडून लहानशी का होईना पण कृती करायला हवी. 

ध्येयाच्या दिशेने आजच लहानसं पाऊल टाका. काही तरी कृती कराच जी आपोआपच इतर कृतींना चालना देईल. तुम्ही तेव्हाच चांगली प्रगती करू शकाल जेव्हा तुमच्याकडे प्रोत्साहन देणारी लोकं असतील. जबाबदारीची जाणीव करून देणारी माणसं असावीत जी तुमचे सल्लागार, मार्गदर्शक असू शकतील. तुम्हाला मदत करून प्रेरणा देऊन सतत कार्यशील बनवतील. तुम्ही तुमची ध्येयं अशा साथीदारांना सांगा ज्यांच्याकडून तुम्हाला सतत मार्गदर्शन व प्रगतीसाठी कायम सूचना मिळत राहतील. माणूस जसा विचार करतो तसा तो बनत जातो. 

एकंदरीत यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्‍चिती हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. जे ध्येय निश्‍चित करतात ते जीवनात यशस्वी होतात, हे विविध उदाहरणांतून जगासमोर सिद्ध झाले आहे. फक्‍त गती असून फायदा नाही, गतीला ध्येय निश्‍चितीची जोड आवश्यक आहे.