Tue, Jul 16, 2019 09:52होमपेज › Konkan › गोवा व महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात संघटीत व्हावे 

गोवा व महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात संघटीत व्हावे 

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:26PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे उत्तम दर्जाचे कृषी विद्यापीठ असून तेथील मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आज मी कृषिमंत्री झालो. तसेच त्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या शेतीमध्येही करीत आहे. गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही कृषी क्षेत्रात मोठा वाव आहे. गोवा व महाराष्ट्र राज्याने एकत्रित येऊन कृषी क्षेत्रात विकास करावा. त्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील, अशी ग्वाही  कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा गोवा राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी वेंगुर्ले येथे केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर अ‍ॅडव्हॉन्मेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या विद्यमाने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये विदेशातील 40 तर देशातील 312 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे, प्रमुख वक्‍ते डॉ. व्हीक्टर गॅलन, कृषी संशोधन स्पेनच्या प्रा.कॅनरी आयलँड, रिलायन्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र गुंजाटे, डॉ.ए. के. सिंग, चार्लस डार्विंग युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाचे डॉ. 

पिंग लू, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते. गोवा राज्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांचा डॉ. व्हीक्टर गॅलन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

परिषदेच्या पहिल्या दिवशी जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र  झाले. ही परिषद 11 मे पर्यंत चालणार असून विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.