होमपेज › Konkan › कुडाळात २२ डिसेंबरपासून सिंधु कृषी पशु-पक्षी मेळावा

कुडाळात २२ डिसेंबरपासून सिंधु कृषी पशु-पक्षी मेळावा

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:32PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ एसटी डेपो मैदानावर  चौथा सिंधु-कृषी व पशु-पक्षी  मेळावा शुक्रवार  22  ते मंगळवार 26 डिसेंबर या कालावधीत होत आहे. शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 1 वा. पर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  या मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.

पिंगुळी येथील फार्म हाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. देसाई बोलत होते. कुडाळ सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण,  सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पशुधन विकास अधिकारी डॉ. अजित मळीक, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले,  शुक्रवार 22 रोजी  सकाळी 10 वा.  मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन, सकाळी 10 ते  दु. 1 वा. पर्यंत आरोग्य शिबिर, सायं. 5 ते 7 वा. पर्यंत कोकणी पारंपारिक फुगडी व  रात्री ‘महारथी कर्ण’ हे संयुक्त दशावतार नाटक. शनिवार 23 रोजी सकाळी 9 वा. बैलगाडी सजावट स्पर्धा, स. 10 ते दु. 1 मुख्य उद्घाटन, सायं. 5.30 ते 7.30 वा डॉग शो, रात्री 8 ते 10 वा. ‘स्वरसंध्या’ हा मराठी गाण्याचा कार्यक्रम.

रविवार 24 सकाळी 10 ते दु. 1 वा. कुक्कुटपालन कार्यशाळा व पशुपालकांचा सत्कार, दुपारी 3 ते सायं. 5 वा. मालवणी कवी दादा मडकईकर यांची मालवणी गीतांची मैफल, सायं. 5 ते 7 वा.  जादुगार वैभवकुमार  यांच्या जादुचे प्रयोग, रात्री 7 ते 8 वा. पखवाज- ढोलकी - जुगलबंदी कार्यक्रम, रात्री 8 ते 10 वा. चिमणी पाखरं डान्स अ‍ॅकॅडमी कुडाळचा  नृत्याविष्कार, सोमवार  25 रोजी सकाळी 10 ते 11.30 वा. कृषि परिसंवाद व प्रगतशील शेतकर्‍यांचा सत्कार,  स. 11.30 ते 1 वा. पशुसंवर्धन परिसंवाद, दुपारी 3 ते 6 वा. जनावरांची विविध स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा,रात्री 7 ते 10 वा. पर्यंत डबलबारी. 26 रोजी काजू परिषद, दु. 3 ते 6 वा. पारितोषिक वितरण व समारोप तर रात्री 7 ते  10 वा. पर्यंत साई कलामंच निर्मित दोन अंकी नाटक ‘अशुद्ध बिजापोटी’  असे कार्यक्रम होणार आहेत. कुडाळला तिसर्‍यांदा हा मेळावा भरविण्याचे यजमानपद मिळत आहे.