Sat, Feb 16, 2019 03:31होमपेज › Konkan › व्यापार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला परवाने केले परत

व्यापार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला परवाने केले परत

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:08PMराजापूर : प्रतिनिधी

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील व्यापार्‍यांच्या मदतीला धावून आलेल्या तालुका स्वाभिमान पक्षाने व्यापार्‍यांची बाजू उचलून धरत त्यांनी घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण करु नये, असा निर्णय घेतला.  त्यानंतर समस्त व्यापार्‍यांनी आपले परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकांकडे परत केले. दरम्यान, स्वाभिमान पक्ष तालुक्यातील व्यापार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, अशी भूमिका ‘स्वाभिमान’चे तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांनी स्पष्ट केली.

 गेली अनेक वर्षे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शासनाने समस्त व्यापारी व शेतकरी यांच्याबाबत दिलेल्या जबाबदार्‍या पार पडलेल्या नाहीत,  याचा संताप येथील व्यापार्‍यांत होता. कृषी उत्पन्न समितीच्या वतीने समस्त व्यापार्‍यांना कायद्याचा धाक दाखवुन परवाने घेण्यास भाग पाडले जाते.

मात्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी - विक्री विकास व अधिनियम 1963 चे कलम 6, उपकलम 2 प्रमाणे असे परवाने घेण्याचे  बंधनकारक नाही. तरीदेखील दरवर्षी असे परवाने घ्यायला भाग पाडले जायचे. यावेळी स्वाभिमान पक्षाने यामध्ये लक्ष घातले. पक्षाचे तालुकाध्यक्ष बेंद्रे  व त्यांच्या सहकार्‍यांनी तालुका खरेदी - विक्री संघात परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकांना जाब विचारीत या तालुक्यातील एकही व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण करणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे व्यापार्‍यांना अधिकच बळ मिळाले व त्यांनी घेतलेले परवाने त्या अधिकार्‍याकडे परत केले.

आता आम्ही कुणीच त्या परवान्याचे नूतनीकरण करणार नाही, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली. तर हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमान’चे तालुकाध्यक्ष बेंद्रे यांनी दिला आहे. यावेळी समस्त व्यापारी वर्गाने  कृषी बाजार समितीच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यावेळी विलास पेडणेकर, दीनानाथ कोळवणकर, जाफर काझी, गजानन वैशंपायन यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.