Tue, Apr 23, 2019 07:46होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधात ८ जूनला एल्गार!

रिफायनरी विरोधात ८ जूनला एल्गार!

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:51PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने दि. 8 जून रोजी सकाळी 11 वाजता देवगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार नितेश राणे करणार असून जनता या रिफायनरी विरोधातील आपला आक्षेप नोंदविणार असल्याची माहिती स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी दिली.

देवडगमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संदीप साटम यांनी रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्वाभिमान पक्ष जनतेच्या पाठीशी असून यापुढेही प्रकल्पाविरोधात पक्षाची भूमिका आक्रमकच राहणार आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत स्वाभिमान पक्ष जनतेसोबतच राहील, असे स्पष्ट केले. यावेळी पं. स. सदस्य रवी पाळेकर हे उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पाविरोधात जनतेच्या बाजूनेच भूमिका घेतली असून प्रकल्पाविरोधात 8 जून रोजी स्वाभिमान पक्षामार्फत आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे, असे यावेळी सांगितले.

या प्रकल्पामध्ये  राजापूर तालुक्याबरोबरच सिंधुदुर्गातील गिर्ये रामेश्‍वरसहित देवगड तालुक्यातील आणखी 15 गावे समाविष्ट करण्यात आली असून यामध्ये खारेपाटणसह कुणकवण, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले, मालपे, पाटगाव, मणचे ही गावे धरणासाठी समाविष्ट केली आहेत. तर पाळेकरवाडी, मुटाट, वाघोटन, सौंदाळे, बापर्डे या गावांचाही समावेश करण्यात आला आहे.

एकीकडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हा प्रकल्प व्हायला पाहिजे, अशी भूमिका जाहीर करीत आहेत, तर दुसरीकडे सत्तेतील घटक पक्ष असलेला शिवसेना प्रकल्पाबाबत धरसोड भूमिका घेत आहे. उद्योगमंत्री एकीकडे राजीनामा देऊ असे सांगतात तर दुसरीकडे प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सह्या करतात यातूनच दुटप्पीपणाची भूमिका दिसून येत आहे. सरकार मधील दोन्हीही राजकीय पक्ष जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत. मात्र, स्वाभिमान पक्षाची प्रकल्प विरोधातील भूमिका ही आक्रमकच राहणार असल्याचे सांगण्यात आले.