Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Konkan › महावितरण विरोधात दोडामार्ग-सावंतवाडीवासीय आक्रमक

महावितरण विरोधात दोडामार्ग-सावंतवाडीवासीय आक्रमक

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 9:59PMकुडाळ : वार्ताहर

कर्मचारी वर्गाचा पुरवठा करणे, मंजूर ट्रान्स्फॉर्मर बसविणे, जीर्ण वीजवाहिन्या बदलणे, जीर्ण खांब बदलणे, वीज  वाहिन्यांवरील झाडी तोडणे यासारख्या अनेक वीजविषयक समस्यांनी त्रस्त झालेल्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील भाजप शिष्टमंडळ व  वीज ग्राहकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांची भेट घेत त्यांना या समस्यांबाबत जाब विचारला. या समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत त्या त्वरित दूर करण्याची मागणी केली. यावेळी पाटील यांनी वीज ग्राहकांसमवेत आपण या तालुक्यात स्वतः बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्याची ग्वाही दिली. 

दोडामार्ग तालुक्यातील  कोनाळ, साटेली, भेडशी, घोटगेवाडी या गावात वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. या समस्यांबाबत लक्ष वेधूनही  कोणतीच कार्यवाही होत नाही. या समस्यांची दखल न घेणार्‍या येथील अधिकार्‍यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हेवाळे ते खालची  बाबरवाडी मुख्य रस्त्याने एस.टी. लाईन टाकण्यात यावी. हेवाळेतील  11 के.व्ही. मंजूर वाहिनीची कामे  तत्काळ  करण्यात यावी. या भागातील जीर्ण व वाहतुकीस अडथळा ठरणारे धोकादायक  खांब बदलून  मिळावेत.

कोनाळ  ग्रा.पं.च्या नळपाणी योजनेसाठी  स्वतंत्र  ट्रान्स्फॉर्मर मंजूर करणे, या भागातील प्रस्ताव केलेल्या शेतीपंपाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय  योजनेतंर्गत वीज जोडणी अद्याप का झालेली नाही असा सवाल  यावेळी लोकप्रतिनिधी व वीज ग्राहकांनी उपस्थित  केला तसेच या भागात वीज वितरणची अनेक कामे  अपूर्ण राहिली असून विजेचा वारंवार खेळखंडोबा होत आहे.

या भागातील  अधिकारी ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष  देत नसल्याने त्यांच्यावर  तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना विज विषयक विविध समस्यांचा सामना वारंवार करावा लागत आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे  अनेक ठिकाणी विजेच्या खांबांची दुरावस्था झाली आहे. तसेच वीज वाहिन्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जुने ट्रान्सफार्मर नादुरूस्त  झाले आहेत. वाफोली, शेर्ले, डिंगणे, तांबोळी, इन्सुली, असनिये, पडवे, माजगाव, तळवडे, वेर्ले, कोलगाव, निरवडे, नेमळे या भागात वारंवार वीज पुरवठा  खंडित होणे व इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून स्ट्रीट लाईटसाठी  तांत्रिक मंजुरी मिळत नाही. या समस्या  तत्काळ न सोडवल्यास वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा  इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी श्री. पाटील यांनी आपण दोन दिवसात या भागात  मिटिंग घेवून समस्यांबाबत चर्चा करण्याची ग्वाही दिली. तसेच शनिवारी महावितरणचे कार्यकारी अभियंता या भागात थेट देवून समस्यांबाबत चर्चा करतील, असे श्री. पाटील  यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे माजी आ. राजन तेली, काका कुडाळकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा चिटणीस रंगनाथ गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, वैभव ईनामदार, बाळा कोरगांवकर, दादू कविटकर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.