Sat, Apr 20, 2019 08:02होमपेज › Konkan › ‘जैतापूर’ विरोधात राजापुरात २७ ला जेलभरो

‘जैतापूर’ विरोधात राजापुरात २७ ला जेलभरो

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:00PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरीचा निर्णायक लढा सुरू असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली आहे. येथील जनहक्‍क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 27 ऑगस्टला  जेलभरो आंदोलन छेडले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात रिफायनरी समवेत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलन पहावयास मिळणार आहे. तालुक्यात सर्वात प्रथम जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तत्कालीन काँग्रेस प्रणित आघाडी शासनाच्या काळात आणण्यात आला. देशातील सर्वात मोठा असा हा दहा हजार मेगावॉट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प असून त्यामधून होणार्‍या रेडिएशनमुळे तालुक्यातील निसर्गसंपदा,भातशेती, बागायती, मच्छीमारी यासह मानवी जीवनावर त्याचे विपरित परिणाम होतील, या भीतीपोटी प्रकल्पग्रस्त परिसरातून

मागील काही वर्षे प्राणपणाने विरोधात लढा सुरु आहे. गेल्या एक दशकाच्या कार्यकालात अनेक आंदोलने कोकण भूमीने पाहिली आहेत. प्रशासन व स्थानिक प्रकल्पग्रस्त जनता यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला होता. काही आंदोलने हिंसक बनली होती. एका आंदोलनादरम्यान तर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तबरेज सायेकर हा आंदोलक गोळी लागून मृत्युमुखी पडला होता. स्थानिक जनतेचा जैतापूरला प्रखर विरोध असताना जगाच्या पाठीवर अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात जनमत बनत चालले आहे. यापूर्वी युक्रेनमधील चर्नोबिल व अलीकडे जपानमधील फुकुशिमा येथे अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागली होती.

त्यामुळे हानिकारक असा जैतापूर प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी कायम असतानाच शासन मात्र तो रेटवू पाहत आहे. त्यामुळे शासनाच्या त्या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आता जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवार दिनांक 27 ऑगस्टला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कार्यरत असलेल्या जनहक्‍क समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, उपाध्यक्ष मन्सूर सोलकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर, नदीम तमके, फकीर सोलकर यांसह असंख्य प्रकल्प विरोधक या जेलभरो आंदोलनात सहभागी होणार असून आपला जाहीर विरोध प्रकट करणार आहेत. याबाबत जनहक्‍क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

गेल्या काही महिन्यांत रिफायनरी विरोधात आंदोलने सुरू असताना आता अनेक महिने थंड असलेले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जेलभरो आंदोलन सोमवारी पुकारण्यात आल्याने जैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे . तालुक्यात दोन मोठ्या प्रकल्पांविरुद्ध आंदोलने होत असल्याने कायदा - सुव्यवस्थेपुढे  चांगलेच आव्हान उभे ठाकले आहे. आता या आंदोलनाचे स्वरूप कसे राहते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.