Fri, Jan 24, 2020 21:58होमपेज › Konkan › भडगाव ग्रामस्थांच्या दबावानंतर तरुणाच्या खुनाचा गुन्हा दाखल

भडगाव ग्रामस्थांच्या दबावानंतर तरुणाच्या खुनाचा गुन्हा दाखल

Published On: Nov 05 2018 1:25AM | Last Updated: Nov 04 2018 11:22PMखेड : प्रतिनिधी

खेड-भरणे मार्गावरील पर्‍ह्यानजीक 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने खेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत शशिकांत खोपकर (रा. भडगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, सुरुवातीला आत्महत्या झाल्याचा अंदाज बांधून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येत होती. मात्र, ग्रामस्थांच्या दबावानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विश्‍वेश्‍वर नांदेडकर यांनी ग्रामस्थांना खुनाचा 
गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.

संकेत खोपकर याचा मृतदेह अण्णाच्या पर्‍ह्यानजिक रस्त्यावर आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी खेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रथमदर्शनी या तरूणाने आत्महत्या केल्याचे वाटत होते. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात आहे अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला व एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

 शनिवारी रात्री या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरली. यानंतर ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय अधिक बळावला. रविवारी येथील ग्रामस्थांनी खेड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ खेड पोलिस ठाण्यावर धडकले होते. त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला. 

अखेर रविवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. अद्याप या मागील कारण स्पष्ट झाले नसून आता त्या दिशेने पोलिस तपास करणार आहेत. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, डीवायएसपी नांदेडकर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.