Sat, Apr 20, 2019 10:19होमपेज › Konkan › किल्ले रायगडावरील मुख्य पायऱ्यांचे काम पावसाळ्यानंतर

किल्ले रायगडावरील मुख्य पायऱ्यांचे काम पावसाळ्यानंतर

Published On: May 07 2018 7:25PM | Last Updated: May 07 2018 7:22PMमहाड : प्रतिनिधी

किल्ले रायगड संवर्धन विकास कामासंदर्भात रायगड प्राधिकरण सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्यामार्फत गडावरील विविध विकासात्मक कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गडावर जाणाऱ्या मुख्य पायऱ्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून गडावरील रोपवे कुशावर्त तलाव मार्गावरील पातळीचे काम सुरू असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तर मुख्य मार्गावरील  लोखंडी रेलिंगच्या कामास सुरूवात केली आहे. 

रायगड प्राधिकरणाअंतर्गत विविध विभागांचे एकत्रीकरण करून या विकासकामांचे नियोजन संबंधित विभागांना देण्यात आले आहे. यामध्ये चित्त दरवाजा ते होळीचा माळ व जगदीश्वरमंदिर मार्गावरील पायऱ्या तसेच पाथवेचे काम  सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येत आहे. याचबरोबर किल्ले रायगडावरील रोपवे च्या मुख्य स्टेशनपासून कुशावर्त तलाव मार्गावरील पदपथवेचे कामही अर्धाहून पूर्ण झाले असून या ठिकाणी खोदाई व अन्य कामे प्रगतीपथावर आहे.     

किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा मार्ग उपलब्ध झाल्याने चित्त दरवाजा ते होळीचा माळ हा मुख्य पादचारी मार्ग दुर्लक्षित राहिला होता. याबाबत विविध शिवभक्त संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर रायगड प्राधिकरणामार्फत या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीकरिता तसेच नव्याने पायऱ्या बांधण्याचा महत्त्वपूर्ण कामास परवानगी देण्यात आली. याबाबतची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर ही कामे प्रत्यक्षात सुरू करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बुले यांनी सांगितले. तसेच गडावर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या राज्याभिषेक सोहळा आणि अन्य काळामध्ये येणाऱ्या शिवभक्तांची संख्या पाहता या मार्गावरील नादुरुस्त झालेल्या व अन्य अत्यावश्यक असलेल्या भागामध्ये रेलिंगच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

रायगड प्राधिकरणामार्फत किल्ले रायगड तसेच गडाच्या परिसरातील गावांमधील अत्यावश्यक असणाऱ्या नागरी सुविधांचा कृती आराखडा नव्याने करण्यात येणार असल्याने अनेक वर्षांपासून या सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या  शिवभक्त व पर्यटक संघटनांकडून समाधान व्यक्त होत आहे . किल्ले रायगडावरील विविध विभागांकडून केली जाणारी ही विकास कामे त्या काळातील  ऐतिहासिक वास्तूंच्या रचनेप्रमाणे राहावीत याबाबत रायगड प्राधिकरणाकडुन आग्रह धरण्यात येत असून किल्ल्यावरील दगडांचा वापर या बांधकामासाठी करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये प्राप्त झाली. 

किल्ले रायगडच्या मुख्य पादचारी मार्गावरील पायऱ्यांच्या दुरुस्ती कामी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ही कामे करणे अशक्य असल्याने पावसाळय़ानंतरच या कामास सुरूवात करणार असल्याची माहिती बांधकाम अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी सोहळ्यावेळी या मुख्य मार्गावरील पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष झाले होते.