अनंत चतुर्दशीनंतरच मच्छीमारी व्यवसायाला मुहूर्त!

Published On: Sep 10 2019 1:19AM | Last Updated: Sep 09 2019 10:38PM
Responsive image


देवगड : प्रतिनिधी

वादळसदृश्य स्थितीमुळे देवगडमधील मच्छीमारी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. मात्र,  पावसाचा जोर कमी झाला असून वार्‍याचा वेगही मंदावला आहे. तरीही अनंत चतुर्दशीनंतरच मच्छिमारी व्यवसायाला सुरूवात होण्याची शक्यता मच्छीमारांमधून व्यक्‍त होत आहे.
गणेशोत्सवामध्ये पावसाने हाहाकार उडविला. त्याचबरोबर समुद्रात दक्षिण वार्‍याने सुरूवात केल्याने 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी व्यवसायाला ब्रेक लागला. हंगामाची सुरूवात चांगली झाली नाही. त्यात समुद्रात दक्षिण वारा 50 ते 60 किमी.वेगाने वाहत असल्याने वादळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासूनच मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला.
देवगड बंदरात हंगाम सुरू झाल्यानंतर 5 ते 10 टक्के नौकाच मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जात होत्या. सुरूवातीला छोटी म्हाकूळ व पापलेट मिळत होते. मात्र तेदेखील कमी प्रमाणात मिळत असल्याने डिझेलचा खर्चही सुटत नव्हता. त्यामुळे देवगड बंदरातील बहुतांशी नौका अनंत चतुर्दशीनंतरच मच्छीमारीसाठी जातील, असे मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी सांगितले.

वार्‍याचा वेग आता काहीसा मंदावला असून पावसाचा जोरही कमी झाला आहे. मात्र, गणेशोत्सव काळात मच्छिमारी व्यवसाय बंद असल्याने खवय्यांची पुरती निराशा झाली. बर्फात साठवणूक करून ठेवलेली मासळी व खाडीत मिळणारी मासळी बाजारामध्ये विक्री केली जात होती. मात्र, या मासळीचे दरही कडाडले होते.पापलेट 500 रूपये, दोडी 100 रूपये वाटा, सुळे एक नग 250 रूपये, शेतुक 300रुपये वाटा अशा प्रमाणात मासळीचे दर होते यामुळे खवय्यांचीही पुरती निराशा झाली. तरीही खाडीतील मासळीला खवय्यांची जास्त पसंती होती. मात्र, मासळीच कमी प्रमाणात असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचाही पुरता हिरमोड झाला.

समुद्रातील वार्‍याचा वेग काहीसा मंदावत असून वार्‍यांचा वेग 30 ते 40 किमी.वर आला आहे तसेच पावसाचा जोरही कमी झाला आहे मात्र समुद्रातील घाळाघाळ अद्याप कायम आहे.तरीही खलाशीवर्ग  हा 11 दिवसांच्या गणेश विसर्जनानंतरच नौकांवर दाखल होण्याची शक्यता असल्याने अनंत चतुर्दशीनंतरच मच्छीमारी व्यवसायाला मुहूर्त मिळेल अशी शक्यता मच्छीमारांमधून व्यक्‍त केली.