Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Konkan › ‘...तर पर्यटक राजापूरकडे वळतील’

‘...तर पर्यटक राजापूरकडे वळतील’

Published On: May 07 2018 11:39PM | Last Updated: May 07 2018 11:31PMराजापूर : प्रतिनिधी

सह्याद्रीपासून ते अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या राजापूर तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे. या नैसर्गिक संसाधनांचा पर्यटनात्मक विकास झाल्यास केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पर्यटक राजापूरकडे आकर्षित होतील, असे सांगतानाच पर्यटन विकासासाठी जे हवं तेच काम ‘माय राजापूर’ करत असून कोकणातील प्रत्येक तालुक्यात अशा संस्था तयार झाल्यास कोकणचा कायापालट होईल, असे प्रतिपादन ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे कार्यवाह संजय यादवराव केले.

राजापूर तालुक्यात पर्यटन, शेती व फलोत्पादन, मदतकार्य आणि पर्यावरण या विषयांवर काम करणार्‍या शहरातील ‘माय राजापूर’ या संस्थेच्या संकेतस्थळाचा अनावरण सोहळा यादवराव यांच्याहस्ते पार पडला. राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आ. गणपत कदम, पुणे येथील वेब डिझायनर संजीव सप्रे, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. छाया जोशी, ‘माय राजापूर’ संस्थेचे प्रमुख जगदीश पवार ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून राजापूरातील पर्यटन स्थळे, मंदिरे, आदींची माहिती एका क्लिकवर मिळेल, त्यामुळे पर्यटक तालुक्याकडे आकर्षित होतील, असा विश्‍वास यादवराव यांनी व्यक्‍त केला. 

ते पुढे म्हणाले की, राजापूर तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक स्थळे आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांचा विकास झालेला नाही. येणार्‍या पर्यटकांना त्याठिकाणी आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत, त्यामुळे पर्यटकांचा ओढा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणवासियांनी आता भावनिक प्रश्‍नांमधून बाहेर पडून विकासाभिमुख व्हायला हवं. कोकणात केवळ देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत, असा विकास झाला पाहिजे, असे ते म्हणाले. 

यावेळी माजी आमदार गणपत कदम यांनी ‘माय राजापूर’ या संस्थेने चांगले कार्य हाती घेतले असून या वेबसाईच्या माध्यमातून राजापूर शहर व तालुक्याची ओळख संपूर्ण देशाला होईल, असे सांगितले. जगभरात प्रसिद्ध असलेली राजापूरचे गंगाक्षेत्र अद्यापही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे गंगाक्षेत्राच्या विकासासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खाडीपात्रात बोटींग सुविधा, समुद्र किनार्‍यावर पुरेशा सुविधा निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतीमध्येही नवनवीन प्रयोग करून आधुनिक शेतीला प्राधान्य देण्यासाठी संस्थने पुढाकार घ्यावा, असे कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी संस्थेचे प्रमुख जगदीश पवार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी ‘माय राजापूर’ संस्थेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा गवाणकर व समीर देशपांडे यांनी केले तर वेबसाईटबद्दल दत्तप्रसाद सिनकर यांनी माहिती दिली. याप्रसंगी राजापुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags :Kokan, Tourist, Visit, Rajapur, Development