Wed, May 22, 2019 22:53होमपेज › Konkan › कोकणवासीयांना दिलासा

कोकणवासीयांना दिलासा

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:32PM

बुकमार्क करा

नागपूर : खास प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या ओखी वादळामुळे बाधित पिके आणि मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, 4 डिसेंबरला झालेल्या ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचेही नुकसान झाले असून, कडधान्य पिकांचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्या, तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने तत्काळ दिले आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे, काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकार्‍यांना कडक सूचना दिल्या जातील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13 हजार 500 रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्यात येईल. नुकसानभरपाईची मदत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ) येण्याची वाट न पाहता तत्काळ दिली जाणार आहे.

ओखी वादळाबाबत धोक्याचा इशारा 3 आणि 4 डिसेंबरला समुद्रकिनार्‍यावर देण्यात आला होता. तो डावलून समुद्रात गेलेल्या सर्व 2 हजार 606 बोटींना योग्यरीत्या संदेश यंत्रणा राबवून कोणतीही जीवितहानी न होता समुद्रकिनार्‍यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा, तसेच कर्नाटक राज्यातील  भरकटून समुद्रकिनार्‍यावर आलेल्या 389 बोटींवरील 2 हजार 885 खलाशांची निवासाची, जेवण- खाण्याची व परत जाण्यासाठी बोटींना डिझेल देण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली. त्यासाठी दोन कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.

मच्छीमारांसाठी आर्थिक मदत

ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 4 हजार 100 रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 9 हजार 600 रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी 2 हजार 100 रुपये, तर पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 2 हजार 600 रुपये मदत दिली जाणार आहे.