Sun, Jun 07, 2020 12:23होमपेज › Konkan › हरचिरी धरण नव्याने बांधण्याचा सल्ला

हरचिरी धरण नव्याने बांधण्याचा सल्ला

Published On: Jul 12 2019 2:08AM | Last Updated: Jul 12 2019 1:58AM
रत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) हरचिरी धरण कालबाह्य झाले आहे. या धरणाचा बंधारा नव्याने बांधण्याचा सल्ला नाशिक येथील सीडीओच्या अभियंत्यांनी (सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन) दिला आहे. घाटिवळे, असुर्डे, आंजणारी या तीन धरणांची दुरुस्ती करावी लागेल, असेही सांगितले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या धरणांची पाहणी नुकतीच सीडीओच्या पथकाने केली.

हरचिरी धरण 1971 साली बांधण्यात आले आहे. धरणाचा बंधारा किंवा धरणाची संरक्षक भिंत फारच कमकुवत झाली आहे. गळती लागल्यानंतर प्रत्येकवेळी हा बंधारा दुरुस्त करावा लागतो. आता या धरणालाच 38 वर्षे होऊन गेल्याने कालबाह्य झालेला हा बंधारा नव्यानेच बांधावा लागणार असल्याचे सीडीओ पथकाने पाहणी करून सांगितले.

एमआयडीसीच्या घाटिवळे, असुर्डे, आंजणारी धरणाचीही सीडीओ पथकाने पाहणी केली. या तिन्ही धरणांची दुरूस्ती करावी लागणार असल्याचेही पथकाने एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना तोंडी सांगितले असून त्या दुरूस्त्या कोणत्या हे लेखी स्वरूपात लवकरच कळवले जाणार आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता करावडे, उपअभियंता भगत व बी. एन. पाटील धरण पाहणी दौर्‍यात सीडीओ पथकासोबत सहभागी झाले होते.

राज्यातील कोणत्याही धरणाचे बांधकाम करायचे असेल आणि कोणतीही दुरूस्ती करायची असेल तर नाशिक  येथील  जलसंपदा  विभागाच्या मध्यवर्ती  चित्र  संकल्पन किंवा सीडीओ कार्यालयाकडून आराखडा घ्यावा लागतो.  हा आराखडाच मिळावा यासाठी रत्नागिरी एमआयडीसीने त्यांच्या चारही धरणांबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्याद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या करायच्या याची विचारणा केली होती. या प्रस्तावानुसार सीडीओ पथकाने गेल्या सोमवारी येऊन धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून काय करावे लागेल हे एमआयसीच्या पथकाने तोंडी सांगितले. लेखी स्वरूपात या उपाययोजना कळवल्या जाणार असून, त्यानंतर त्या कामांची निविदा होऊन पुढील प्रक्रिया होणार आहे.