Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Konkan › कृषी पंप जोडणीचा चौदाशे शेतकर्‍यांना लाभ

कृषी पंप जोडणीचा चौदाशे शेतकर्‍यांना लाभ

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गेल्या अडीच वर्षांत 1450 कृषी पंप जोडण्या देण्यात आल्या असून उद्दिष्टाच्या 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने यावर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता ई.व्ही. मामीलवाड यांनी दिली. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची काही शेती दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. तेथे वीज जोडणी देण्याचे आव्हान होते. शेतीच्या आजुबाजूचे जागामालक आपल्या जागेत विद्युत खांब उभा करण्यासाठी परवानगी देत नव्हते. परंतु, यावर यशस्वी तोडगा काढून वीज जोडणी देण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील सर्व कार्यालयांत विशेष यंत्रणा राबवण्यात आली होती. त्यामुळे कामात प्रगती झाली.
वरिष्ठ कार्यालयात मटेरियलची केलेली मागणी काही प्रमाणात पूर्ण झाली असून अपघातामुळे मोडलेले, वाकलेले पोल बदलण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी जीर्ण झालेल्या लाईन सुद्धा बदलण्यात येत आहेत तर आवश्यक तेथे नवीन लाईन टाकण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी ‘लो-व्होल्टेज’च्या तक्रारी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात अनेक मीटर्स ‘फॉल्टी’ आहेत. 10 वर्षे जुने झालेले मीटर्स व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या वीजबिलात तफावत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करून अशा ग्रहकांची वीजमीटर बदलून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण कमी असल्यामुळे भारनियमन होत नसल्याचे सांगण्यात आले.