होमपेज › Konkan › वनराई बंधार्‍यासाठी जिल्ह्यात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

वनराई बंधार्‍यासाठी जिल्ह्यात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:42AM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात उभारण्यात येणार्‍या वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी  ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात  आला आहे.  कृषी विभाग, वनविभाग आणि महसूलसह सर्व शासकीय कार्यालयांना या योजनेंतर्गत सुमारे अडीच हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली. 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधणीच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नवा कृती आराखडा तयार केला आहे.  यानुसार निर्धारित बंधार्‍यांपेक्षा जादा बंधार्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाचे पाणी साठविण्याचे जिल्ह्यात फारसे स्रोत नाही. गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही बर्‍याच भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.

गेल्या वर्षी जास्त पाऊस झाला असला तरी राज्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात होतो. मात्र, तरीही जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होतेच. या समस्येवर मात करण्यासाठी 2012 पासून जिल्हा परिषदेने वनराई व कच्चे बंधारे घालण्यास सुरुवात केली. या योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये हजारोंनी बंधारे घालण्यात आले.

दरम्यान, मार्च महिना आल्यावरच पाणीटंचाईच्या झळा जिल्हावासीयांना सोसाव्या लागतात. यावर वनराई व कच्च्या बंधार्‍याशिवाय ठोस अशी पर्यायी उपाययोजना किंवा प्रकल्प शासनाच्या दृष्टीक्षेपात आतापर्यंत तरी नाही. दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी पंचायत समिती कृषी विभाग यांच्यावर सोपविण्यात येते. जिल्हा प्रशासनाकडून  आदेशही देण्यात येतात. गेल्या वर्षी उद्दीष्ट जरी पूर्ण झाले नसले तरी 7 हजार 500 पैकी 5000 बंधारे पूर्ण करण्यात आले होते. 

डिसेंबर पर्यंत हे उद्दीष्ट पुर्ण करायचे असते. त्या नुसार बंधारे उभारण्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला असून, तो कार्यान्वित करण्यात आला आहे. नव्या कृती आराखढ्यानुसार बंधारे उभारण्यासाठी भूगर्भ जिऑलॉजिकल तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेेण्यात येणार आहे. जेथे आवश्यक आहे तेथेच या बंधार्‍यांची उभारणी करण्यात येणार आहे. बंधारे उभारताना ते भविष्यात पक्के करण्याच्या प्रस्तावातूनच बंधार्‍यांची उभारणी करण्यात येणार आहे.