Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Konkan › वाहतुकीचे नियम मोडणार्‍या पोलिस अधिकार्‍यालाच पोलिसांचा हिसका!

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या पोलिस अधिकार्‍यालाच पोलिसांचा हिसका!

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:23PMमालवण : प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यांनी एका पोलिस अधिकार्‍यांच्या गाडीचाच थरारक पाठलाग करून कारवाई केल्याची घटना शनिवारी दुपारी मालवणात घडली. दरम्यान, सर्वानाच कायदा समान हे धोरण राबवत जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक सेवा बाजवणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मालवण- देऊळवाडा येथे  जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी बाबुराव राठोड, शेखर मुणगेकर, उन्मेष पेडणेकर, उमेश थाळेकर हे सेवा बजावत होते. दुपारी 1 वा. च्या सुमारास मालवणच्या दिशेने येणार्‍या एमएच 04 जीबी 0123 या क्वालिस कारला पोलिसांनी थांबविले. कारचालकाकडे परवाना व गाडीची कागदपत्रे तपासणीसाठी मागितली. मात्र, आपल्याकडे परवाना नाही व गाडीची कागदपत्रे वडिलांकडे आहेत, असे कारचालकाने सांगत वडिलांना त्याने बोलावणे केले. काही वेळातच एक पोलिस वर्दी असलेले उपनिरीक्षक दर्जाची एक अधिकारी त्याठिकाणी आले व त्यांनी पोलिसांनी पकडलेली क्वालिस गाडी घेऊन निघण्यास सुरुवात केली.

मात्र वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले व आपला या गाडीचा काय संबंध? अशी विचारणा केली. त्यावेळी आपण ही गाडी मुंबईवरून खरेदी केली असून मुलगा ही गाडी घेऊन येत होता असे त्या अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र वाहतूक पोलिसांनी गाडीची कागदपत्रे व मुलाचे लायसन दाखविल्याशिवाय गाडी सोडणार नसल्याची  भूमिका  घेतली. त्यानंतर तो अधिकारी गाडी तेथेच ठेऊन तिथून निघून गेला व अर्ध्या तासाने पुन्हा  परतला. तेव्हा ही त्यांने पोलिसांना कोणतीही विचारणा न करता गाडी घेऊन निघून गेला. वाहतूक पोलिसांनीही त्या गाडीचा मालवण बाजारपेठेत थरारक पाठलाग केला.

पोलिस मागावर आहेत हे लक्षात येताच त्यांनी थेट गाडी पोलिस ठाण्यात नेली. मात्र, त्याठिकाणी अधिकारी  उपस्थित नव्हते व पाठलाग करणार्‍या वाहतूक पोलिसांनीही कागदपत्रे व परवाना नसेल तर दंडात्मक कारवाई करणारच, असे वाहतूक पोलिसांनी ठणकावून सांगितले. अखेर आपल्या मुलाकडे नसलेला वाहतूक परवाना लक्षात घेता गाडीची सर्व कागदपत्रे दाखवत पुन्हा देऊळवाडा याच ठिकाणी वाहतूक पोलिसांकडे त्या अधिकार्‍याने दंडात्मक रक्‍कम जमा करून गाडी ताब्यात घेतली. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या पोलिसांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन प्रकरणीही केल्या जाणार्‍या धाडसी कारवाई बाबत जनतेतून समाधान व्यक्‍त होत आहे. तर पोलिसांनी धूम स्टाईल बाईकस्वारांवरही विशेष पथकाद्वारे कारवाई करावी,अशी मागणीही केली जात आहे.