होमपेज › Konkan › मच्छींद्रनाथ तपोभूमीत दोन गटात हाणामारी

मच्छींद्रनाथ तपोभूमीत दोन गटात हाणामारी

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:22PMकुडाळ : वार्ताहर

महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मच्छींद्रनाथ तपोभूमी येथे गेलेल्या ग्रामस्थांना मारहाण केल्याप्रकरणी प्रमोद सावंत व तीन महिलांसह 9 जणांविरोधात कुडाळ पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. जखमींमध्ये एका 72 वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. यावेळी दोन्ही गटामध्ये झटापट झाली. यादरम्यान दुसर्‍या गटातीलही काही व्यक्‍ती जखमी झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या व्यक्‍तींकडून  मिळाली.

कुडाळ न्यायालयाने 30 जानेवारी 2018 रोजी मच्छींद्रनाथ तपोभूमी येथील देवाचे कार्यक्रम हे प्रमोद सावंत यांचे कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी एकत्र मिळून करावेत, असा आदेश झाला होता. यानंतर ग्रामस्थ हा आदेश घेऊन मंदिरात गेले. त्याठिकाणी असलेले प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना हा आदेश दाखवत देवस्थानचे सर्व कार्यक्रम ग्रामस्थांनी मिळून करूया, असे सांगितले. यावेळी प्रमोद सावंत यांनी हे देवस्थान वैयक्‍तिक मालकीचे आहे मंदिरात काय करायचे, ते आम्ही करू. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही फक्‍त सहकार्य करायचे बाकीचे सर्व व्यवहार आम्ही करणार असे सांगितले.

यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेतल्यावर तहसीलदारांनी कोर्टाचा निकाल असेल तर आदेशानुसार तुम्ही कार्यक्रम करा, असे सांगितल्याने ग्रामस्थांनी रात्री 8 वा. जाऊन मंदिरातील आरती केली. यानंतर 3 फेब्रुवारी रोजी गावातील पुरोहित नीळकंठ माईणकर हे पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता पुन्हा वाद झाला.