Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Konkan › फार्मासिस्ट नसलेल्या ‘मेडिकल’वर कारवाईची गरज

फार्मासिस्ट नसलेल्या ‘मेडिकल’वर कारवाईची गरज

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 9:01PMरत्नागिरी : प्रतिनिधी

खाद्यपदार्थांसह नागरिकांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाची बाब म्हणजे विविध आजारांवरील औषधे. औषध प्रशासनाचा साराच कारभार आता ऑनलाईन झाल्याने काही ठिकाणी फार्मासिस्टच नसलेल्या दुकानांचे पेव फुटल्याचे चित्र आहे. अन्न विभागाप्रमाणे औषध विभागही मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करत तक्रारीनंतरच जुजबी कारवाईचा फार्स करीत असल्याचे चित्र आहे. या विभागाकडे औषध दुकानांसह रक्तपेढ्यांवरही अंकुश ठेवण्याची जबाबदारी आहे. कालबाह्य आणि दुष्परिणाम करणार्‍या औषधांची विक्री सध्या तरी जोमात आहे. 

सध्या धकाधकीच्या जीवनात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आदींच्या रुग्णांची  संख्या वाढल्याचे चित्र आहे. अशा रुग्णांना रोज औषधे घ्यावीच लागतात. जिल्ह्यात औषध दुकानांतून विविध आजारांची औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची विक्री केली जाते. यावर औषध विभागाचा अंकुश असतो. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 नुसार औषध दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला आहेत. मात्र,  यात त्रुटी दिसतात.  

अनेक औषध दुकानांमध्ये कालबाह्य औषधे सर्रास ठेवली जातात. त्याची विक्रीही केली जात असल्याची तक्रार आहे. मात्र, या विभागाला त्यावर कारवाई करता येत नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते. औषध दुकानात फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी दुकानांमध्ये कामगारच  कारभार करीत असल्याचे चित्र आहे. कालबाह्य औषधांसाठी एक पेटी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, अशी पेटी अपवादानेच दिसते.

केवळ औषध दुकानेच नाही तर आजार पूर्ण बरे करण्याचे दावे करणार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला आहेत. मात्र, अशा दावेदारांवर कारवाई होताना दिसत नाही. शहरी भागासह ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरले आहे. अशा औषधांमुळे अनेकांना आतड्यांचे गंभीर आजार झाल्याची उदाहरणे आहेत. यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

प्रबोधनाची मोहीम गरजेची

अनेकदा डॉक्टरांकडून रुग्णांना साईड इफेक्ट होणारी औषधे लिहून दिली जातात. अनेकदा कम्पाऊंडरने दिलेल्या चिठ्ठीवर तसेच जुन्या चिठ्ठीवरही औषधे दिली जातात. नागरिकांच्या मागणीनुसारही दुकानदारांकडून किरकोळ आजारांवर औषधे दिली जातात. याबाबत प्रबोधनाची मोहीम औषध प्रशासनाने राबवण्याची गरज आहे.