होमपेज › Konkan › काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींवर पक्षांतर्गत कारवाईची पावले

काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींवर पक्षांतर्गत कारवाईची पावले

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:31PM



सावंतवाडी : प्रतिनिधी 

काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायत  सदस्यांनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे; अन्यथा पक्ष बैठकांना सातत्याने गैरहजर राहणार्‍या लोकप्रतिनिधींना पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिला आहे.
 सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र ऊर्फ बाब्या म्हापसेकर, जिल्हा प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परुळेकर, काशिनाथ ऊर्फ बाबल्या दुभाषी, माजी तालुकाध्यक्ष  बाळा गावडे आदी उपस्थित होते

विकास सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्वराज्य संस्थांचे अनेक सदस्य हे काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हावर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे ते पक्षाचे अधिकृत सदस्य आहेत. पक्षघटनेनुसार या लोकप्रतिनिधींनी  पक्ष बैठका तसेच पक्ष आयोजित कार्यक्रमांना उपस्थितीत राहणे बंधनकारक आहे.  मात्र, काही लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांना सातत्याने गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. या लोकप्रतिनिधींची ही कृती पक्ष विरोधी मानून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण राणेंसोबत स्वाभिमान पक्षात गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी हा गर्भित इशारा दिला आहे.