Thu, Jun 20, 2019 14:42होमपेज › Konkan › भरधाव कंटेनर घेताहेत बळी

भरधाव कंटेनर घेताहेत बळी

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:27PM

बुकमार्क करा

सावर्डे : वार्ताहर

मुंबई - गोवा महामार्गावर दिवसागणिक अपघातांचे प्रमाण वाढतच चाललेले आहे. भरधाव कंटेनरमुळे निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. चिपळूण तालुक्यातील असुर्डे निर्मलवाडी फाट्यानजीक गोव्याच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरने भरधाव वेगाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. यामुळे एकूणच बेदरकार कंटेनरमुळे महामार्गावर मृत्यूंचे तांडव सुरू आहे. 

मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कधी मार्गी लागणार याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. दिवसेंदिवस महामार्गावर अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी असुर्डेनजीक झालेल्या अपघाताने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वीर देवपाट वरून दिवसभर नोकरी बजावून घरी परतत असताना शंकर रामचंद्र बुधर या महावितरण कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.

महामार्गावरून बेदरकारपणे कंटेनर चालविल्याने अपघात होत आहेत. या अपघातात कुटुंबाचे आधारवडच मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे त्या कुटुंबाला कोणी वालीच उरत नाही. भयाण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय अशा कुटुंबांकडे पर्याय राहात नाही. घरातील कर्ता पुरुषच अपघातात ठार झाल्यानंतर आयुष्य कसे जगायचे, हा यक्ष प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा असतो. मोठ्या आवाजात गाणी लावून कंटेनर चालविणार्‍यांची संख्या मोठी आहे. यंत्रणेकडूनही कंटेनर चालकांकडून दंड (?) घेण्याशिवाय कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे महामार्गावरील ही मृत्यूची मालिका कधी संपणार, असा सवाल प्रवासीवर्गातून उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन आणि पोलिस कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.

टोल वाचविण्यासाठी मुंबई-गोवा मार्गाचा पर्याय

मुंबई-बंगळूर एक्स्प्रेस हायवेवरील टोल वाचविण्यासाठी कंटेनरसारखी अवजड वाहने मुंबई-गोवा महामार्गाकडे वळतात. या अवजड वाहनांचे चालक टोल पदरात पाडून घेण्यासाठी या महामार्गावरून प्रवास करतात. पुणे-बंगळूर मार्गावर ठिकठिकाणी टोल नाके आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर टोल भरावा लागतो. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास केल्यास हा टोल भरावा लागत नाही.