Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Konkan › सातार्‍यात अपघात; पिंगुळीचा एक ठार

सातार्‍यात अपघात; पिंगुळीचा एक ठार

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:51PMसातारा/कुडाळ : प्रतिनिधी

मुंबईहून गोकाक (बेळगाव) येथे लग्‍नासाठी निघालेली भरधाव स्विफ्ट कार व मालट्रक यांचा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खोडद (ता. सातारा) गावच्या हद्दीत भीषण अपघात होऊन त्यामध्ये कारमधील तीन जीवलग मित्र जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. कारचा चक्‍काचूर झाला आहे.

या अपघाताची कुडाळ-पिंगुळीमध्ये माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, पिंगुळी ग्रा.पं. सदस्य सिद्धार्थ धुरी, महेश पालकर, सागर पालकर, सर्व्हेश दळवी, मनीष पालकर यांनी सातारा येथे सोमवारी सकाळीच धाव घेतली. मृत राजाराम पालकर यांचा शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेत सोमवारी सायंकाळी उशीरा कुडाळमध्ये दाखल झाला. मंगळवारी राजाराम याच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. राजाराम पालकर याच्या अकाली निधनाने पालकर कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजाराम याच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अभिषेक उत्तम देसाई (28,गोवंडी), विक्रम वसंत माने (28,बेळगाव) व राजाराम मोहन पालकर (24, रा. पिंगुळी, शेटकरवाडी, ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत.

रविवारी रात्री उशिरा अभिषेक देसाई, विक्रम माने व राजाराम पालकर हे स्विफ्ट कारमधून गोकाक (बेळगाव) येथे लग्नसमारंभासाठी निघाले होते. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार सातार्‍यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर महामार्गावरील खोडद गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगातील ही कार पुढे असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोरात ठोकली. दुर्घटनेचा  आवाज ऐकल्यानंतर लगतच्या पेट्रोलपंपावरील  कर्मचारी व हॉटेलमधील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. भीषणता पाहून त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.

अपघातस्थळी काचांचा व रक्‍ताचा सडा पडला होता. या अपघाताची फिर्याद सोमनाथ रामचंद्र घोरपडे(रा.निसराळे) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. सोमवारी दुपारी उशीरा तिन्ही युवकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले.