Fri, Nov 16, 2018 21:33होमपेज › Konkan › ... तर रेल्वे कार्यालयाला टाळे ठोकणार : नीलेश राणे

... तर रेल्वे कार्यालयाला टाळे ठोकणार : नीलेश राणे

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी
ऑनलाइन परीक्षेच्या निकालासह कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या 15 दिवसांत मान्य करा अन्यथा 1 सप्टेंबरला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा एकत्रित मेळावा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने गुरुवारी रत्नागिरीमध्ये मराठा मंडळ सभागृहात झाला. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्‍या नीलेश राणे यांना प्रकल्पग्रस्तांनी या मेळाव्याला निमंत्रित केले होते. यावेळी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आजपर्यंत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला.

राणे म्हणाले की, केवळ निवेदने, मेळावे घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सुटणार नाहीत तर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मला माहिती आहेत, तुमच्यावर होणार्‍या अन्यायाची जाण आहे. तुम्ही तुमचा हक्‍क मागताय. तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. कोकण रेल्वे तुमची आहे. संपूर्ण कार्पोरेशनमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुुळे आता आमची मुलं तुमच्याकडे नोकरीची भीक मागणार नाहीत, त्यांचा हक्‍क घेणार आणि त्यासाठी मी तुमच्या वतीने  संघर्ष करायला तयार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर हातणकर तसेच तिन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.