Wed, Apr 24, 2019 08:23होमपेज › Konkan › अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार : रामदास कदम 

अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार : रामदास कदम 

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:12PMखेड : प्रतिनिधी

विमान चोरीबाबत जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी लवकरच विरोधकांवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवार दि.18 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. 

खेड नगरपालिकेला हस्तांतरणासाठी संरक्षण विभागाकडून पाठविण्यात आलेले ना. कदम यांचे स्वीय सहायक योगेश सदावर्ते यांनी पर्यावरण मंत्र्यांच्या निर्देशाने चोरल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. याबाबत खेडेकर यांनी खेड पोलिस ठाण्यातदेखील तक्रार दिली आहे. या प्रकरणी सोमवारी सेनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सीमा वंडकर, रेशम पाटणे, प्रज्योत तोडकरी, दिनेश पुजारी आदी उपस्थित होते. निकेतन पाटणे यांनी ना. कदम यांच्यावर खोटे आरोप करण्यात  आल्याचे म्हटले. 

याबाबत दि.16 जून रोजी संरक्षण राज्यमंत्री यांचे उपसचिव केदार पुरांडे यांनी खेड पालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून ना. कदम यांच्या विनंतीनुसार विमान मंजूर करण्यात आले आहे, असे स्पष्टपणे केंद्र शासनाकडून कळविलेदेखील आहे. मात्र, वैभव खेडेकर व आमदार संजय कदम यांनी खोटा बनाव करून माझ्या बदनामीचा कट रचून खोटी तक्रार दिली आहे. हे विमान मंजुरीचा व वैभव खेडेकर यांचा कोणताही प्रयत्न नाही. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून मंजुरीचे पत्र त्यांना मिळाल्यानंतर जणु मीच विमान आणले अशी पत्रकार परिषद घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.  याबाबत जनमाणसात बदनामी केल्या प्रकरणी लवकरच अब्रु नुकसानीचा दावा टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे ना.कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

... तर आम्हीही दावा ठोकू : वैभव खेडेकर

शिवसेना नेते व राज्याच्या पर्यावरण मंत्र्याकडून अशा प्रकारे श्रेय लाटण्यासाठी आचारसंहितेची बोबडी सबब पुढे केली जात असून विमान चोरी केल्याच्या आरोपावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी रितसर चौकशी होऊ संरक्षण विभागाकडून कारवाई होईल. परंतु, आमच्यावर खोटा दावा दाखल केल्यास आम्हीदेखील दुप्पट दावा दाखल करू, अशी प्रतिक्रिया खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना सोमवारी दिली.