होमपेज › Konkan › चार महिन्यांत सव्वाआठ हजार वाहनांची नोंदणी

चार महिन्यांत सव्वाआठ हजार वाहनांची नोंदणी

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गेल्या चार महिन्यांत तब्बल सव्वाआठ हजार वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या चार महिन्यांत परिवहन विभागाने कोटीच्या कोटी उड्डाणे केली असून नोंदणी व कारवाईपोटी 20 कोटी 77 लाखांचा महसूल जमा झाला आहे.

आंबा, काजू व मासळीबरोबरच भाताची शेती आणि चाकरमान्यांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. आंबा व मासळी हंगामादरम्यान  दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच माल वाहतुकीची वाहने खरेदीकडे कल दिसून येतो. वाहन कर्ज व्यवस्थाही सुलभ असल्याने वाहन खरेदी सोयीस्कर झाली आहे. दर महिन्याला वाहन खरेदीची संख्या दीड हजारांच्या आसपास असते. गणपती, दसरा, दीपावली - बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत अनेक जण वाहने घरी आणतात. या कालावधीत वाहनांची संख्या दोन ते तीन हजारांपर्यंत नोंदविली जाते.

गत आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये 20,941 वाहनांची नोंद झाली असून  एकूण वाहनांची संख्या जिल्ह्यात 3 लाख 32 हजारांहून अधिक आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 15,870 दुचाकी वाहनांची, तर 2,974 नव्या चारचाकी वाहनांची नोंद जिल्ह्यात झाली होती. एप्रिल 2018 ते जुलै 2018 या चार महिन्यांमध्ये 6,723 दुचाकी वाहनांची तर कार, जीप आदी चारचाकी 858 वाहनांची नोंदणी झाली आहे. दुचाकी, कार, अवजड वाहने, जेसीबी, बस यासह विविध प्रकारची 8,265 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. वाहन नोंदणी व कारवाई पोटी चार महिन्यांत  20 कोटी 77 लाख 66 हजार 753 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

वाहन नोंदणी शुल्क, विविध कर, परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्‍या सुरक्षा मोहिमा यातून परिवहन विभागाला महसूल प्राप्‍त होत असतो. वाहनधारकांना अधिक सोयीसुविधा पुरविण्यावर व सेवा पारदर्शक देण्यावर परिवहन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.   -विनोद चव्हाण (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,रत्नागिरी)