Sat, Aug 24, 2019 23:50होमपेज › Konkan › गावखडी समुद्रात झेपावली ‘ऑलिव्ह रिडले’ची 31 पिल्‍ले

गावखडी समुद्रात झेपावली ‘ऑलिव्ह रिडले’ची 31 पिल्‍ले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावरून तुरुतुरु चालत ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्‍लांनी आपल्या अधिवासात प्रवेश केला. शुक्रवारी (दि.30) सकाळी 12, तर संध्याकाळी 19 पिल्‍लांना ‘निसर्गयात्री’ संस्थेने त्यांना संरक्षित केलेल्या घरट्यातून सुखरूप समुद्रात सोडले. सकाळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, प्रांत अमित शेडगे, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी, तर संध्याकाळी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी हे नयनरम्य द‍ृश्य पाहण्यास हजेरी लावली. 

‘निसर्गयात्री’ संस्थेने गेल्या वर्षी 687, तर चालू वर्षी कासवाच्या सुमारे 450 पिल्‍लांना समुद्रात सोडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली. समुद्राच्या पाण्यापासून सुमारे 50 मीटर अगोदर ही पिल्‍ले सोडण्यात आली. येथून ती तुरुतुरु चालत समुद्रातील आपल्या अधिवासात गेली. ऑलिव्ह रिडले मादीने घातलेली अंडी शोधून ती जागा आजूबाजूने जाळी लावून संरक्षित केली. 45 ते 50 दिवसांनंतर या अंड्यातून पिल्लांचा जन्म होतो. जसा पिल्लांचा जन्म होतो, तशी ती पिल्ले सुरक्षितरीत्या समुद्राच्या पाण्यात जाण्यासाठी खबरदारी घेतली जाते.

‘निसर्गयात्री’ संस्थेचे प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील आणि त्यांचे सहकारी हे जैवविविधता जोपासण्याचे काम करीत आहेत. चालू वर्षी त्यांनी 800 ते 900 
अंडी संरक्षित केली. त्यातील सुमारे 450 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. पिल्ले समुद्रात जातानाही संस्थेचे पदाधिकारी फारच काळजी घेतात. पिल्ले समुद्रात जात असताना आणि पाण्यात गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटे पाण्यात कोणालाही जाऊ दिले जात नाही.गावखडी समुद्रात झेपावली ‘ऑलिव्ह रिडले’ची 31 पिल्‍ले

Tags : Konkan, Konkan News,  450 puppies, turtle, necessary, care, leave, ocean


  •