Mon, Mar 25, 2019 09:30होमपेज › Konkan › उर्दू शाळेचा शिक्षक देतोय सिगारेट ओढण्याचे धडे 

उर्दू शाळेचा शिक्षक देतोय सिगारेट ओढण्याचे धडे 

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 8:50PMआरवली : वार्ताहर

कोंडीवरे येथील उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना सिगारेट ओढण्याचे धडे देत असल्याची तक्रार पालकांनी कोंडीवरे ग्रामपंचायतीकडे केली आहे. याबाबत तालुका शिक्षण विभाग मात्र गप्प असल्याने पालक संतापाची भावना व्यक्‍त करीत आहेत. जोपर्यंत संबंधित शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.

शिक्षण विभाग गप्प असल्याने आणि परीक्षा तोंडावर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे  प्रभारी सरपंच जाकीर शेकासन यांनी सांगितले.

संगमेश्‍वर तालुक्यातील कोंडीवरे येथील उर्दू प्राथमिक शाळेत ही संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना सिगारेट ओढण्यासाठी माचिसची व्यवस्था करून दिली, अशी पालक फरहान कारीगर आणि इरफान खतीब या पालकांनी लेखी तक्रार ग्रामपंचायतीकडे दिली. प्रभारी सरपंच जाकीर शेकासन यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेऊन ग्रामस्थांना शाळेत बोलावून ही गंभीर बाब त्यांच्या कानावर घातली. शिक्षक निसार तांबे यांनी आपण हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्यानंतर जाकीर शेकासन यांनी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना कळविली. पालकांनी दिलेला तक्रारी अर्जही गटशिक्षण अधिकार्‍याकडे दिला, मात्र शिक्षण विभागाकडून एवढी मोठी गंभीर घटना घडूनही कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्याने तीव्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

शाळेच्या आवारात धुम्रपान करण्यास निर्बंध आहेत. असे असताना चक्क शाळेतच आणि तेही मुख्याध्यापकाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना सिगरेट पेटवून देण्यास शिक्षकच मदत करीत असल्याने या शिक्षकावर कारवाई का होत नाही? असा सवाल आता पालक विचारीत आहेत. शाळेत झोपा काढीत असल्याने या शिक्षकावर सहा महिन्यांपूर्वी पालकांच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली होती. कारवाई म्हणून या शिक्षकाला तालुक्यातील घाटीवळे येथील शाळेत कामगिरीवर पाठविण्यात आले होते. मात्र काही दिवसातच पुन्हा कोंडीवरे येथील शाळेत पालकांच्या तक्रारी असताना शिक्षण विभागाने पुन्हा रुजू केले. या सगळ्या प्रकरणाकडे होणार्‍या दुर्लक्षाला शिक्षण विस्तार अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य आणि प्रभारी सरपंच जाकीर शेकासन यांनी केला आहे. 

शिक्षकी पेशाला काळिमा फासणार्‍या या शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच शिक्षण विभागाने अशा शिक्षकाला पाठीशी घालू नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.