Mon, Jun 24, 2019 21:20होमपेज › Konkan › संगमेश्‍वरचे संभाजी स्मारक अद्यापही बंदिवासात

संगमेश्‍वरचे संभाजी स्मारक अद्यापही बंदिवासात

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:53PM

बुकमार्क करा

आरवली : वार्ताहर

भूमिपूजनानंतर थोडी थोडकी नव्हे तर 32 वर्षे उलटूनही संगमेश्‍वरचे अपूर्णाववस्थेतील संभाजी स्मारकाचे काम मार्गी न लागल्याने आजही या स्मारकाच्या नशिबी  ‘बंदिवास’ आला आहे.
32 वर्षांपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन झाले तेव्हा संभाजी राजांचे भव्यदिव्य स्मारक उभारायचे हा हेतू निश्‍चितच अभिमानास्पद होता. मात्र, जिद्द आणि चिकाटीचा अभाव असल्याने 65 लाखांपेक्षा अधिक निधी खर्च होऊनही पहायला मिळते, ते बंद गेटचे कुलूपच!  सद्य:स्थितीत या स्मारक इमारतीला झाडाझुडपांनी पूर्णत: वेढलं असून किमान या दुर्दशेतून तरी स्मारक परिसराची सुटका व्हावी, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी केली आहे . 

संगमेश्‍वर ही ऐतिहासिक भूमी समजली जाते. कसबा-संगमेश्‍वर परिसराला फार मोठी ऐतिहासिक परंपरा असून चालुक्य राजवटीतील शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार असणारी मंदिरं, सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड याचबरोबर इतस्ततः विखुरलेल्या विरगळी, दुर्लक्षित मूर्ती यामुळे कसबा - संगमेश्‍वर नगरीत देश-विदेशांतील पर्यटक येत  असतात. याच कसबा गावात छ. संभाजी महाराजांना दगाबाजीनं पकडण्यात आल्याने येथे संभाजी स्मारक उभारलेले असणार या अपेक्षेने इतिहासप्रेमी या परिसराला भेट देत असत.

1992 पर्यंत या गावात संभाजी महाराजांची अर्ध प्रतिमाही नव्हती. इतिहासप्रेमी तसेच पर्यटक यांची मागणी लक्षात घेऊन दि. 11 मार्च 1986 साली मुंबई  -गोवा महामार्गावर संभाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारावं म्हणून भूमिपूजन करण्यात आलं. या स्मारकात ग्रंथालय, संभाजी महाराजांच्या जीवनावरील तैलचित्र, म्युरल, अर्धप्रतिमा आदी गोष्टींचे नियोजन करण्यात आले. या स्मारक कल्पनेने रत्नागिरी जिल्हावासीय नव्हे तर संपूर्ण कोकणवासीयांमध्ये उत्साह संचारला. 

भूमिपूजन झाल्यानंतर स्मारकाचं काम वेगाने सुरु होइल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीन वर्षे काम सुरु होण्यात गेली. त्यानंतर सुरु झालेले काम 1992 साली सात फुटांपर्यंत भिंतींचं बांधकाम झाल्यावर निधीअभावी रखडले ते अनेक वर्षे तसेच होते. याच दरम्यान इमारतीला झाडाझुडुपांनी पूर्णपणे व्यापून टाकलं. स्मारकाच काम निधीअभावी रखडल्याने वर्तमानपत्रांनी याबाबत सातत्याने लक्ष वेधलं. या नंतर शासकीय निधीचा ओघ सुरु झाला. आराखड्यात बदल करण्यात आला. यानंतर काम सुरु व्हायचं निधी संपल्यावर बंद पडायचं. विविध लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घातलं. परत निधीचा ओघ सुरु झाला. जिल्हा नियोजन मंडळानेही भरीव निधी दिला. सर्व मिळून जवळपास 65 लाखांपेक्षा अधिक निधी खर्च झाला असला तरी या स्मारकाची दुर्दशा अद्यापही संपलेली नाही. बांधकाम विभागाने दर्जाची तमा न बाळगता काम करुन घेतलं आणि असंच दर्जाहीन स्मारक समितीकडे हस्तांतरित केले. 

छ. संभाजी स्मारकाची इमारत पूर्ण झाली मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने ही इमारत प्रेमीयुगुलांचे, मद्यपींचे, गर्दुल्यांचे आडोशाचं ठिकाण बनलं. स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीचा हा असा वापर होऊ लागल्याने संगमेश्‍वर येथील संभाजीप्रेमी युवकांनी पर्शुराम पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय यंत्रणेसह पोलिस यंत्रणेचं लक्ष वेधलं. एवढ्यावरच न थांबता पर्शुराम पवार यांनी स्वत: खर्च करुन सर्व परिसराची साफसफाई करत स्मारकस्थळी विद्युतरोषणाई करुन शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रमही केला होता. यानंतरही स्मारक समितीमार्फत कोणतेही खास प्रयत्न झाले नाहीत. सद्य:स्थितीत  स्मारकाला झाडंझुडपांनी वेढले असून इतिहासप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.