Wed, Feb 20, 2019 20:56होमपेज › Konkan › खासगी आराम बस आगीत खाक

खासगी आराम बस आगीत खाक

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 9:07PMआरवली : वार्ताहर 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आराम बसने चिपळूण तालुक्यातील आगवे येथे अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. बसला इंजिनच्या भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ही घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी बसमधील प्रवाशांचे सामान आगीत भस्मसात झाले. ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस (एमएच03-सीपी-1472) चिपळूण तालुक्यातील आगवे येथे आली असता अचानक  बसला आग लागली. दरम्यान, धावत्या इंजिनला आग लागताच चालकाने बस महामार्गाच्याकडेला उभी केली. इंजिनमधील ऑईल कोटा कमी झाल्याने ही आग लागल्याचे चालक घटनेनंतर सांगत होता. घटनास्थळी आगीचे रौद्ररुप पाहून चालक तसेच क्लिनरने घाबरुन पलायन केले.  

बसला आगीने वेढताच चालकाने क्लिनरच्या मदतीने प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितले. झोपेत असलेले प्रवासी गोंधळल्यामुळे जिवाच्या आकांताने धावपळ करू लागले. धावपळीत प्रवाशांचा बॅगा गाडीतच राहिल्यामुळे काहींचे दागिने, पैसे, मोबाईल कागदपत्रे या घटनेत जळून गेले. स्थानिक ग्रामस्थांपैकी चिरंजीव भंडारी, अनिकेत भंडारी, सुमित भंडारी, सुदर्शन भंडारी, पंकज साळवी, रुपेश भंडारी आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात मदत केली. घटनेची माहिती समजताच सावर्डे पोलिसांनी धाव घेतली. अग्निशामक बंब बोलावण्यात आले. चिपळूणहून बंब येण्यास एक तास लागला. तो पर्यंत आगीने बसला चारही बाजूने वेढले होते. त्यामुळे महामार्गावरील एक तास वाहतूक रोखण्यात आली.