होमपेज › Konkan › फुणगूस खाडीत दोघांचा बुडून मृत्यू

फुणगूस खाडीत दोघांचा बुडून मृत्यू

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 10:22PMआरवली  : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूस खाडीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने  पाचपैकी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास फुणगूस कडेवठार येथे घडली. या दुर्घटनेत प्राण गमावलेले दोन्ही तरुण मुंबईहून नातेवाईकांकडे पूजेसाठी आले होते. 

प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय 16, कल्याण), साहिल दिनेश सावर्डेकर (14,  रा. जोगेश्‍वरी, मुंबई) अशी  या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाडीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले.

रविवार असल्याने तसेच उन्हाचा कडाका जास्त असल्याने साहिल हेमंत रामपूरकर (19), साईराज कोंडविलकर (18), प्रथमेश दिनेश चव्हाण (17) या तिघांना घेऊन सकाळी 9 वाजता प्रसन्न व साहिल सावर्डेकर फुणगूस कडेवठार येथील  पांगेरा बंदर येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. विशेष म्हणजे यातील एकालाही पोहता येत नव्हते. याचवेळी खाडीत भरती सुरु झाली होती. भरतीचे पाणी वाढू लागल्यावर  पाण्याचा अंदाज न आल्याने ते खाडीपात्रात बुडू लागले. यावेळी घटनास्थळी आरडाओरड झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तोपर्यंत प्रसन्न व साहील  हे खोल पाण्यात दिसेनासे झाले होते. इतर तिघांना ग्रामस्थांनी बाहेर काढण्यात यश मिळवले. 

या घटनेनंतरच्या शोध मोहिमेदरम्यान खाडीच्या पाण्याला भरती असल्याने पट्टीच्या पोहणार्‍यांशिवाय कुणीच त्यांचा शोध घेऊ शकत नव्हता. अखेर माभळे येथील मोहन लक्ष्मण जाधव यांना बोलावून घेत दोघांचा शोध सुरु झाला. स्थानिक ग्रामस्थांनी या कामात मोठी मदत केली. बुडालेल्या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास यश आले.या घटनेची माहिती हेमंत बळाराम रामपूरकर यांनी संगमेश्‍वर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.