होमपेज › Konkan › पन्नास वर्षे कावीळ रुग्णांवर मोफत औषधोपचार

पन्नास वर्षे कावीळ रुग्णांवर मोफत औषधोपचार

Published On: Aug 12 2018 10:30PM | Last Updated: Aug 12 2018 10:30PMआरवली : वार्ताहर

कावीळ या आजारावर गावठी औषध फार गुणकारी समजले जाते. तेर्‍ये बुरंबी येथील प्रमिलाताई श्रीकांत म्हैसकर आजीबाई वयाच्या 80व्या वर्षीही काविळीवर मोफत औषधोपचार करुन रुग्णांना बरे करीत आहेत. 

आयुर्वेदिक औषधांचा प्रभाव थोडा उशिराने झाला तरी त्यांचा अपाय होत नसल्याने कोकणात या औषधांचा आजही मोठ्या विश्वासाने घरोघरी वापर केला जातो. कोकणच्या ग्रामीण भागात वनौषधींची माहिती असणारी जाणकार मंडळी आजही घराघरातून आहेत. आजीबाईचा हा औषधी बटवा म्हणजे कुटूंबासाठी मोठा आधार ठरतो. श्रावण महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाटणच्या  दुर्गम भागातून अनेक वैदू आयुर्वेदिक औषधे घेऊन कोकणात दरवर्षी  विक्रीसाठी येतात. यामुळे आयुर्वेद आणि कोकण यांचे फार पुरातन नाते यातून अधोरेखित होते.

संगमेश्वर तालुक्यातील तेर्‍ये -बुरंबी हे प्रमिला आजींगाव. या गावाला प्रमिलाताईंनी आपल्या मोफत रुग्ण सेवेतून एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे पती येथील हायस्कूलवर मुख्याध्यापक होते. फावल्या वेळात काहीतरी काम हवे म्हणून त्यांनी  माहित असलेल्या वनौषधींपासून काविळीवर खात्रीपूर्वक औषध द्यायला सुरुवात केली. रुग्णांना बरे वाटू लागल्याने प्रमिला आजींच्या औषधाची ख्याती केवळ संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता ती मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहचली. उपचारासाठी येणारा रुग्ण गरीब असो अथवा श्रीमंत कोणाकडूनही औषधाचे मोल घ्यायचे नाही, असा निग्रहच प्रमिला आजींनी अगदी सुरुवातीलाच केला. असंख्य रुग्ण काविळीच्या आजारातून बरे झाल्यानंतर प्रमिला आजींना आवर्जून भेटायला येतात आणि पैसे घेण्याचा आग्रह करतात. मात्र, त्यांनी आजवर एकाही रुग्णाकडून एक रुपयाही स्विकारलेला नाही.

काविळीवर औषध द्यायचे म्हणजे ती वनस्पती अथवा मूळं सहज उपलब्ध होण्यासाठी प्रमिला आजींनी याची आपल्याच घरपरड्यात लागवड केली आहे. या वनस्पतींची त्या 80 व्या वर्षीही स्वत: जोपासना करतात. आजही त्या देवपुजेसाठी लागणारी फुले चाफ्याच्या झाडावर स्वतः चढून काढतात. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या त्या कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून ओळखल्या जातात. रुग्णांना काविळीवर दिले जाणारे औषध पाट्यावर वाटावे लागते. हा सर्व खटाटोप त्या स्वतः आनंदाने करतात. 

गेली 50 वर्षे प्रमिलाताई काविळीवर मोफत औषध देत असून आजवर हजारो काविळीचे रुग्ण त्यांनी बरे केले आहेत . मोफत औषध सेवेबरोबरच परिस्थितीने अत्यंत गरीब असणारी मुले, मुली यांना स्वतःच्या घरी आसरा देवून त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचे व्रतही त्यांनी जोपासले आहे.  या मुलांना दहावी - बाराव पर्यंत शिकवून त्यांना दिशा देण्याचे काम त्यांचे मुलगे दिलीप, दीपक, प्रसाद आणि सुना देखील तितक्याच प्रेमाने आणि कर्तव्यभावनेने करीत आहेत. त्यांच्या या अविरत रुग्णसेवेबद्दल आणि सामाजिक बांधिलकेबद्दल अनेक सामाजिक संस्था आणि मान्यवर मंडळींनी  प्रमिला आजींबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.