Thu, Jan 17, 2019 22:40होमपेज › Konkan › आरे-वारे किनार्‍याचा मागवला अहवाल

आरे-वारे किनार्‍याचा मागवला अहवाल

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 8:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आरे-वारे येथे ओहोटीच्यावेळी दुर्घटना घडतात; मात्र, त्याची सखोल चौकशी करून तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी मेरिटाईम बोर्ड आणि पोलिसांना दिले आहेत.आरे-वारे किनार्‍यावर बोरिवलीतील कुटुंब बुडाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून किनारी सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. तातडीच्या बैठकीमध्ये पाच जीवरक्षक नेमण्यासह वॉच टॉवर, बचावाचे साहित्य आणि सूर्यास्तानंतर पोहण्यास मनाईचा निर्णय घेतला आहे; मात्र, ऑक्टोबर 2017 ला पाच तरुण बुडाल्यानंतर सहा महिन्यांत प्रशासनाकडून जीवरक्षक का नेमले नाहीत, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बोरिवलीतील डिसोझा कुटुंबातील पाच सदस्य नुकतेच आरे-वारे समुद्रात बुडून मृत पावले. पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळला असून ओहोटीच्यावेळी पोहणार्‍यांना पाणी आतमध्ये खेचून घेते. याठिकाणी खाडीचे मुख असल्याने पाण्यालाही प्रचंड करंट आहे. त्यात उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालतात. या घटनेनंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी तातडीने बैठक घेतली. मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा परिषद, आपत्ती व्यवस्थापन विभाग यासह सर्व खात्याच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. साधकबाधक चर्चा केल्यानंतर यावर तोडगा काढण्यात येणार आहे. आरे-वारेत तातडीने पाच जीवरक्षक नेमले जाणार आहेत. त्याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडे सोपवण्यात आली आहे. चौदावा वित्त आणि कोकण ग्रामीण पर्यटन विकासमधून निधी दिली जाणार आहे.

किनारे सुरक्षेसाठी 2005 ला बनवलेल्या यादीत आरे-वारेचा समावेश नव्हता. गेल्या काही वर्षांत हा बीच पर्यटनासाठी पुढे आला. येथे सुरक्षेसाठी उपाय केलेले नव्हते. सध्या वारंवार दुर्घटना घडत असून गेल्यावर्षी पाच तरुणांचा येथे बुडून मृत्यू झाला होता.