होमपेज › Konkan › चिपळुणात नागरी आरोग्य केंद्र सुरू करणार

चिपळुणात नागरी आरोग्य केंद्र सुरू करणार

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 9:01PMचिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून उभारलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून त्यात एम.बी.बी.एस. डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केल्याची माहिती जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शासनाच्या ‘एनयूएचएम’ (नागरी प्रा. आ. केंद्र) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नगर परिषदांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयाची उभारणी करण्याची योजना हाती घेण्यात आली. चिपळूण न.प.ने मालकीच्या जागेवर वडनाका परिसरात असलेल्या जुने कॉटेज म्हणजेच सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या पेशव्यांची धर्मशाळा म्हणून ओळख असलेल्या इमारतीचे रूपांतर नागरी प्रा. आ. केंद्रात  केले. या रुग्णालयाची इमारत बांधून दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र, इथे शासन निकषानुसार आवश्यक असणार्‍या एम. बी. बी. एस. डॉक्टरची उपलब्धता नसल्याने आजतागायत शासनाच्या ‘एनयूएचएम’ योजनेचा व या इमारतीची वाटचाल दुरवस्थेकडे सुरू झाली आहे. सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च करुन इमारत उभारण्यात आली. मात्र, शहरातील नागरिकांना आवश्यक डॉक्टरच उपलब्ध नसल्याने इमारत वापराविना पडून आहे. योजनेअंतर्गत आवश्यक डॉक्टर भरती व अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम शासनाने जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर सोपविले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून येथे डॉक्टर भरती होणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत आवश्यक असलेले प्रयत्न झालेले नाहीत. या बाबत गोयल यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्‍त केली. डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस पदवी प्राप्‍त विद्यार्थ्यांना या रुग्णालयात शासन नियमानुसार  एक वर्षाची सेवा करण्यासाठी येथे नेमणूक करण्याचे नियोजन असून त्याद‍ृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येणार आहे. लवकरच वैद्यकीय सुविधा व डॉक्टर उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.