Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Konkan › जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षम होणार!

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षम होणार!

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:38PMओरोस : प्रतिनिधी

‘एक गाव, एक पोलिस’ योजनेमुळे कायदा व सुव्यवस्था सक्षम होईल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सिंधुदुर्ग पोलिस दलाने सुरू केलेल्या ‘एक गाव, एक पोलिस’ उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आला.या शुभारंभप्रसंगी ना. केसरकर बोलत होते. याच वेळी पोलिस तपास यंत्रणेसाठी सर्व सुविधांनी युक्‍त मोटार सायकल ‘आय बाईक’, नाईट बॅटन, बॉडी वॉर्न कॅमेरे आदी योजनाचे ही पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक निमीष गोयल आदी उपस्थित होते. ‘एक गाव,एक पोलिस’ ही योजना राज्यात प्रथम औरंगाबाद जिल्ह्यात तर त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांशी समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. महाराष्ट्र पोलिसांमध्ये जो संयम आहे तो भारतातील अन्य पोलिस यंत्रणेत कोठेही नाही. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांबद्दल विश्‍वास वाटण्याचे काम या योजनेमुळे होईल.आय.टी. क्षेत्रात काम  करणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर पोलिसांचा यांच्याशी संपर्क असेल तर या प्रवृत्तीलाही आळा बसू शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.  
सिंधुदुर्गातील दोन पोलिस उपविभागामध्ये प्रत्येकी दोन ‘ई- बाईक’ देण्यात आल्या आहेत. गुन्हा घडल्यावर तेथे पोहोचून तातडीने पुरावे उपलब्ध करण्यासाठी उपयुक्‍त या ई- बाईक प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी असाव्यात म्हणून अजून चार ई- बाईकच्या प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. वाहतूक पोलिसांना 55 हजार रुपयांच्या बॉडी वॉर्न कमेर्‍यांच्या प्रस्तावही वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. पोलिसांचे स्वत:च्या मालकीचे घर व्हावे व सीसीटीव्ही यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 10 टक्के निधी ठेवण्याचे धोरण आहे. प्रत्येक तालुका पोलिस स्टेशन जवळ पोलिस हॉस्टेल असावे. तेथे जीम, लॉन्ड्री, उपहार गृह ही सुविधा असेल. याबाबतचा आठही तालुक्यांचा प्रस्ताव देण्याचे ना. केसरकर यांनी सूचित केले. शिरोडा समुद्र किनार्‍यावर सर्वाधिक विदेशी नागरिक पर्यटनाला येतात. सिंधुदुर्गातील अन्य पर्यटन स्थळांवरही असे होणे अपेक्षित आहे. म्हणूनच ‘टुरिझम पोलिस’ ही संकल्पनाही राबविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 
 जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, या उपक्रमामुळे नागरिक व पोलिसांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. तसेच विविध नवीन तंत्रज्ञानामुळे पोलिस सक्षम होतील. नागरिकांनाही दहशत, भय व गुन्ह्यांपासून मुक्‍तता मिळू शकेल. प्रारंभी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी ‘एक गाव,एक पोलिस’, ‘आय बाईक’, ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ व ‘नाईट बॅटन’ या  उपकरणांची परिपूर्ण माहिती दिली. 
यावेळी सागरी सुरक्षा व दहशतवादी कारवायांबाबत नागरिकांनी घ्यायची दक्षता या संदर्भात दोन लघुफिती दाखविण्यात आल्या.  प्रारंभी पालकमंत्री यांच्या हस्ते  ई- बाईकना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. आभार  अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक निमीष गोयल यांनी मानले. कार्यमक्रमासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.