Tue, Apr 23, 2019 06:37होमपेज › Konkan › रायगडावर प्रचंड गर्दी; अरुंद पायवाट, पायर्‍यांवर चेंगराचेंगरी

रायगडावर प्रचंड गर्दी; अरुंद पायवाट, पायर्‍यांवर चेंगराचेंगरी

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 10:28PMकिल्ले रायगड : वार्ताहर

ऐतिहासिक किल्ले रायगडावर बुधवारी उत्साहात पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येने आलेल्या शिवभक्‍तांना रोपवेची सुविधा न मिळाल्याने सोहळा आटोपून परतत असताना, अरुंद पायवाट आणि पायर्‍यांवर चेंगराचेंगरी झाली. याच दरम्यान महादरवाजा येथे बुरजावरून आलेल्या दगडाने एक शिवभक्‍त जागीच ठार झाला, तर दोन महिलांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीमुळे महादरवाजादेखील बंद करून गडावर आलेल्या शिवभक्‍तांना रायगड उतरणे थांबवण्यात आले. तर हा महादरवाजा बंद झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

रायगडावर बुधवारी शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली. यामुळे रोप वे आणि पायवाटेवर चालण्यासदेखील जागा उरली नाही. चित्त दरवाजा ते हत्ती तलावपर्यंत शिवभक्‍तांची रांग दिसत होती. जेवढी गर्दी किल्ले रायगडावर मुख्य सोहळ्याला दिसत होती, तितकीच खालीदेखील असल्याने प्रशासनदेखील या गर्दीपुढे हतबल झाले. शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना पायी येणार्‍यांची गर्दी आणि गड उतरणार्‍यांची गर्दी यामुळे अरुंद पायवाट आणि पायर्‍या यामुळे खुबलढा बुरुज, महादरवाजा, या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा घटना घडल्या. याच दरम्यान महादरवाजा ते खुबलढा बुरुज यादरम्यान डोंगरावरून आलेल्या दगडाने एकाचा प्राण घेतला. अशोकदादा उंबरे (वय 19, रा. उळूप, ता. भूम, जिल्हा उसमानाबाद) असे या मृत शिवभक्‍ताचे नाव आहे.

त्याच्यासोबत चालत असलेल्यांपैकी मंदा मोरे (45, रा. सोलापूर), सोनाली गुरव (30, सातारा), अमोल मोरे (23, हडपसर), रामदेव महादेव चाळके (39), अभिजित फडतरे (23, सातारा), नीलेश फुटवळ (35), अमित महांगरे (24, खेड शिवापूर) हे जखमी झाले आहेत. या जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.रायगडावर झालेल्या गर्दीने दुपारी किल्ले रायगडावर जाणार्‍या शिवभक्‍तांना आणि गड उतरत असणार्‍या शिवभक्‍तांना थांबवण्यात आले. गडाचा महादरवाजा बंद करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूला मोठीगर्दी उसळली. जो तो गड उतरण्याच्या दिशेने असल्याने अनेकांनी रायगडाच्या तटबंदीवर चढून उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही  शिवभक्‍त सुरक्षितस्थळी जाण्याच्या प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी होत होती. या गर्दीपुढे पोलिस प्रशासनदेखील हतबल झाले. गेले दोन दिवस जमलेल्या गर्दीचा अंदाज पोलिस प्रशासनाने घेणे आवश्यक होते.मृत अशोक हा शिवभक्‍त होता. त्याच्या छातीवर शिवरायांचा फोटो आणि शिवबा नाव कोरलेले होते.