होमपेज › Konkan › बंधार्‍यांमध्ये दापोली जिल्ह्यात ‘नंबर वन’

बंधार्‍यांमध्ये दापोली जिल्ह्यात ‘नंबर वन’

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:32PMदापोली : प्रवीण शिंदे

दापोली तालुक्यामध्ये एकूण 806 बंधारे बांधून दापोली तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंधार्‍यात अव्वल ठरला आहे. तालुक्यात एकूण 106 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून दापोली तालुक्याने ही मजल मारली आहे. 806 पैकी 481 विजय बंधारे, 138 वनराई बंधारे तर 187 कच्चे बंधारे बांधण्यात आले.

चिखलगावमध्ये 55 तर तेरेवायंगणी येथे 35 बंधारे बांधून या दोन गावांनी दापोली तालुक्याच्या पटलावर आपला ठसा उमटवला आहे. हे सर्व बंधारे सार्वजनिक विहिरी, नळ पाणी योजनांच्या विहिरींच्या पाणीपातळीसाठी उपयुक्‍त ठरणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यापासून तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेतली असून प्रत्येक गावातील लोकांनी बंधारा बांधणीत सहभाग नोंदवला आहे. काही ठिकाणी बंधारा बांधतेवेळी वैयक्‍तिक खर्चदेखील करण्यात आला आहे.

दापोली तालुक्यामध्ये दरवर्षी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये दापोली तालुक्यामध्ये गतवर्षी 41 गावे आणि 63 वाड्यांचा समावेश होता तर यावर्षी 31 गावे आणि 54 वाड्यांचा यात समावेश आहे. दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यामध्ये गावांची संख्या कमी होताना दिसत आहे. बंधार्‍यांचा फायदा लोकांना पाण्याच्या  पातळीत वाढ होण्यासाठी होत आहे.

शासनाने ‘लोकसहभागातून बंधारे’ हा उपक्रम राबवून लोकांच्या हिताची योजना सुरू केली आहे, असे दिसत आहे. दापोली तालुक्याच्या काही भागाची भौगोलिक स्थिती बंधारा बांधण्यासाठी अनुकूल नाही. काही गावे सागरी किनारी असल्याने या ठिकाणी बंधारे बांधता आले नाहीत.  पाज, दाभोळ, नेवसे, आडे, मुर्डी, सोंडेघर आणि हर्णै या ग्रामपंचायतींना बंधारे बांधण्यात अडथळे येत आहेत.  असे असूनही दापोलीतील अनेक ग्रामपंचायतींनी बंधारा बांधण्यामध्ये विक्रम नोंदविला आहे.

बंधारा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक आणि सिमेंट पिशव्या अशी सामुग्री देण्यात येते. तालुक्यामध्ये एकूण 106 ग्रा.पं. असून यापैकी  ग्रामपंचायतींनी 806 बंधारे बांधून विक्रम नोंदवला आहे. तर काही गावातून अजूनही बंधार्‍यांचा रिपोर्ट दापोली पंचायत समितीच्या हाती येणार असल्याचे दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी सांगितले. ग्रामस्थांनी बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने दापोली तालुका अव्वल ठरला आहे.