Mon, May 27, 2019 01:32होमपेज › Konkan › तब्बल १२५ एकर जमीन ओलिताखाली

तब्बल १२५ एकर जमीन ओलिताखाली

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:37PMआरवली : जाकीर शेकासन

उपलब्ध पाणीसाठ्यापासून सिंचनाची व्यवस्था निर्माण करीत संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी, धामणी आणि चिखली या 3 गावांमधील मिळून सुमारे 125 एकर जमीन बारमाही ओलिताखाली आली आहे. यासाठी येथील शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्याच्या अ‍ॅलिकॉन आणि बासुरी फाऊंडेशन या संस्थांच्या मदतीने अवघ्या 4 वर्षांच्या कालावधीत हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

चार वर्षांपूर्वी राजवाडीतील कृषिरत्न पुरूष बचत गटाच्या 15 शेतकर्‍यांनी पुढाकार घेत नदीवर शिवकालीन पाणीसाठवण योजनेतंर्गत बांधलेल्या बंधार्‍यातून पाणी उचलण्याची योजना तयार केली. नदीपासून सुमारे 1 किमी लांबीचे चर खोदून शेतापर्यंत पाईपलाईन टाकत पाणी नेले आणि सुमारे 20 एकर क्षेत्रावर उन्हाळी कडधान्ये, भाजीपाल्याचे उत्पादन सुरू केले. त्याच्या पुढील वर्षी 10 शेतकरी एकत्र  होऊन त्यापुढील सुमारे 10 एकर क्षेत्र ओलिताखाली आणले. 

कोकणात मागेल त्याला शेततळे या योजनेला येथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण अ‍ॅलिकॉनच्या भक्कम आर्थिक पाठिंब्यामुळे राजवाडीच्या शेतकर्‍यांनी डोंगरमाथ्यावर 30 मीटर बाय 30 मीटर बाय 3 मीटरचे शेततळे खोदून गेल्या पावसाळ्यात तेथे सुमारे 35 लाख लिटर पाणी साठवले. यंदाच्या उन्हाळी हंगामात डोंगर उताराचा फायदा घेत पाईपद्वारे हे पाणी सुमारे 25 एकर शेतांपर्यंत नेले आहे. राजवाडीतील ब्राह्मणवाडीतही अशाच स्वरूपाची जवळच्या नदीचे पाणी उचलून वाडीतील शेतीच्या बारमाही सिंचनाची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्यातून सुमारे 25 एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अशा प्रकारे या गावातील 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन योजनांसाठी मिळून एकूण सुमारे साडेतीन कि.मी.च्या पाईपलाईन टाकत सुमारे 80 एकर क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य झाले आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजवाडीचे माजी सरपंच संतोष भडवळकर, उपसरपंच आणि या सर्व उपक्रमांचे समन्वयक सुहास लिंगायत, विद्यमान सरपंच नंदकुमार मांजरेकर, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे, पो.पा. विलास राऊत, कृषीरत्नचे अध्यक्ष मनोहर सुर्वे, सुरेश भडवळकर, नवजीवन गटाचे अध्यक्ष सिताराम बाईत, सचिव जयराम भडवळकर, गंगाराम भडवळकर, सुरेश भडवळकर आदींचा  सहभाग आहे.

राजवाडीतील या सिंचन योजनांपासून प्रेरणा घेऊन सुमारे 3 कि.मी. अंतरावरील धामणी या गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येत श्री गणेश शेतकरी उत्पादक बचतगटाची स्थापना केली. गावाजवळून वाहणार्‍या नदीचे पाणी उचलून डोंगरातून सुमारे अडीच कि.मी. चर खोदत त्यांच्या शेतापर्यंत नेले आणि सुमारे 25 एकर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणत केळीची बाग फुलवली तसेच भाजीपाल्याचेही उत्पादन सुरू केले. बचतगटाचे अध्यक्ष धाकटु बांबाडे, उपाध्यक्ष अमोल लोध, सचिव आणि या सर्व उपक्रमांचे समन्वयक माजी सरपंच प्रकाश रांजणे, शांताराम बडद, हरिश्चंद्र बडद, प्रकाश बसवणकर आदींचा या उपक्रमात सहभाग होता. तर येथील नवलाई महिला बचत गटाने दुग्धव्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकले असून प्रत्येकी 3 संकरित आणि देशी गाईंच्या दुधाचे उत्पादन आणि विक्री प्रायोगिक तत्वावर सुरू केले आहे.

चिखली हे या सिंचन योजनेतील तिसरे गाव असून नुकतेच तेथे 20 एकर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आले आहे. येथील 18 शेतकर्‍यांच्या भूमिरत्न पुरूष गटाचे बाळकृष्ण धनावडे अध्यक्ष असून सरपंच रवींद्र कानाल हे सचिव आहेत. त्याचबरोबर भिकाजी धनावडे, श्रीकांत पाल्ये, विजय धनावडे, शशिकांत डिंगणकर आदी सदस्यांचा सहभाग आहे. 

या सर्व उपक्रमांमध्ये राजवाडीच्या लोकसक्षमीकरण चळवळीचे अध्यक्ष सतीश कामत यांच्या संस्थेतर्फे समन्वयाची भूमिका पार पाडली जात आहे. तसेच दापोलीच्या डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पराग हळदणकर यांचे मार्गदर्शन नियमितपणे मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.