Mon, Mar 18, 2019 19:46होमपेज › Konkan › पत्नी, मुलासमोरच वाळू व्यावसायिकाचा बुडून मृत्यू

पत्नी, मुलासमोरच वाळू व्यावसायिकाचा बुडून मृत्यू

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:33PMकुडाळ : प्रतिनिधी

नेरूरपार खाडीत ‘मुळे’ पकडण्यासाठी गेलेल्या वाळू व्यावसायिक राजन ऊर्फ बबन बाळकृष्ण पारकर (45, नेरूरपार-पारकरवाडी) हे अवघ्या 20 मीटर अंतरावर पाण्यात बुडाले तेही काठावर बसलेल्या चक्‍क पत्नी व मुलाच्या समोरच. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 वा.च्या सुमारास नेरूरपार कर्ली खाडीपात्रात  घडली. स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करत राजन पारकर यांचा पाण्यात ठाव घेतला, पण त्याचे प्रयत्न  अपुरे पडले. अखेर  मालवण येथील स्कुबा डायव्हींगच्या पथकाला बोलावून शोधमोहीम सुरू केली असता चार तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर राजन पारकर यांचा मृतदेह किनार्‍यापासून 20 मीटर अंतरावर खाडीपात्रात आढळला.

त्यानंतर पारकर यांचा मृतदेह कुडाळ येथे शवविच्छेदन करून ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला. शुक्रवारी नेरूरपार येथील स्मशानभूमीत पारकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.   

कुडाळ तालुक्यातील नेरूरपार खाडीत गुरूवारी सकाळीच राजन पारकर खाडीपात्रात मुळे पकडण्यासाठी उतरले होते. घराच्या समोरच खाडी असल्याने व ते स्वतः वाळू व्यावसायिक असल्याने समोरच्या खाडीच्या पात्राचा त्यांना  अंदाज होताच, तास-दीड तासाच्या अथक प्रयत्नाने त्यांनी आपल्या कमरेला बांधलेल्या पिशवीत ‘मुळे’ जमा केले. दरम्यानच्यावेळी खाडीला भरती लागली होती. खाडीच्या काठावर असलेली पत्नी व मुलगा पारकर यांना आवाज देत असल्याने व पुरेसे  मुळे जमा  झाल्याने पारकर यांनी खाडीकिनारी जाण्याची तयारी केली. पण अचानक ते पाण्यात बुडाले.

पती पाण्यात बुडत असल्याचे खाडीकिनारी उभ्या असलेल्या पत्नीने पाहताच तिने आरडा ओरड केली. मुलानेही टाहो फोडला पण काही क्षणात खाडीतील पाण्यातून राजन पारकर दिसेनासे झाले. स्थानिक  ग्रामस्थांनी धावाधाव करीत होडी  व काठ्याच्या साहाय्याने राजन पारकर यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा पत्ता काही लागू शकला नाही. अखेर देवदास नाईक यांनी मालवण येथील स्कुबा डायव्हींगच्या पथकाला पाचारण करण्यासाठी फोनाफोनी केली. अखेर 11.30 च्या सुमारास नेरूरपार खाडीत मालवण येथील स्कुबा डायव्हींगचे 4 जणांचे पथक उतरले.

त्यांनी स्थानिकांच्या होड्या घेवून शोधमोहीम सुरू केली. भरती सुरू झाल्याने त्यांना शोधकार्यात मोठ्या अडचणी  येत होत्या. तरीही त्यांनी शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर दुपारी 2.30 च्या सुमारास राजन पारकर यांचा मृतदेह खाडी किनार्‍यापासून 20 मीटर अंतरावर आढळून आला. शोध मोहिमेदरम्यान खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर स्थानिक ग्रामस्थांची गर्दी होती.