Thu, Sep 20, 2018 10:13



होमपेज › Konkan › 30 वीरपत्नींना एस.टी.चा आजीवन मोफत प्रवास

30 वीरपत्नींना एस.टी.चा आजीवन मोफत प्रवास

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 24 2018 12:44AM



रत्नागिरी ः सीमेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 30 वीरपत्नींना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत ही मोफत प्रवास सवलत वीरपत्नींना मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून आतापर्यंत राज्यातील 639 वीरपत्नींना आजीवन मोफत पास देऊन त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. 

देशाच्या सीमेवर शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी राज्य सरकारने ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना’ आणली आहे. त्यानुसार वीरपत्नींना एस.टी. प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत. 

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय वीरपत्नींची संख्या अशी : कोल्हापूर 78, पुणे 75, सांगली 71, मुंबई 12, सातारा-90, सोलापूर-33, सिंधुदुर्ग-30, अहमदनगर-29, रायगड (पेण)-16, ठाणे-17, नाशिक-16, औरंगाबाद-15, बीड-15, लातूर-15, बुलढाणा-13, उस्मानाबाद-10, धुळे-9, अकोला-9, अमरावती-9, जळगाव-8, यवतमाळ-8, नागपूर-8, परभणी-6, भंडारा-6, नांदेड-5, वर्धा-3, चंद्रपूर-1, गडचिरोली-1, जालना-1. सर्वात जास्त पास सातारा, तर सर्वात कमी पास चंद्रपूर, गडचिरोली व जालना जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहेत. भविष्यकाळात काळात जास्तीत जास्त वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्राच्या वतीने देण्यात आली आहे.