होमपेज › Konkan › रस्त्यावर सापडला बिबट्याचा बछडा

रस्त्यावर सापडला बिबट्याचा बछडा

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:00PM

बुकमार्क करा
कुडाळ : प्रतिनिधी

तेंडोली-आराववाडी व कुंभारवाडीच्या मध्यभागी असलेल्या डोंगराच्या पायथ्याखालील रस्त्यावर एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सोमवारी सकाळी 8 वा.च्या सुमारास दिसून आला. वस्तीतील कुत्र्यांनी त्या बछड्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी सतर्क ग्रामस्थांनी त्या बछड्याला संरक्षण देत वन विभागाला कल्पना दिली. वन विभाग, पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी त्या बछड्याला ताब्यात घेत कुडाळ येथे प्राथमिक उपचार करून सोमवारी सायंकाळी तेंडोलीतील डोंगरी भागात सोडून दिले.

दरम्यान, कुडाळ येथील राजन नाईक घटनास्थळी पोहोचले असता, त्यांनी याबाबतची कल्पना वन विभाग, पोलिस, महसूल आदी विभागांना दिली. सरपंच भाऊ पोतकर, निवती पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाकारे, पोलिसपाटील संजय नाईक आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  अखेर वन विभागाने त्या बछड्याला प्राथमिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविले. कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खानोलकर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

वन विभागाचा राहणार वॉच

तेंडोलीतील जंगलात ज्या ठिकाणी बिबट्याचा बछडा आढळला त्याच भागात त्या बछड्याला सोडण्यासाठी वन विभागाचे चार जणांचे पथक रवाना झाले. मादी बिबट्याचा अंदाज घेऊन त्या बछड्याला त्याच भागात सोडण्यात येणार आहे. त्या बछड्यावर वन विभागाचे चारही कर्मचारी वॉच ठेवून राहणार असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल श्री. कोकितकर यांनी दिली.