Sat, Dec 07, 2019 14:38होमपेज › Konkan › साटेलीतून अपहरण झालेली मुलगी मध्यप्रदेशमधून ताब्यात

साटेलीतून अपहरण झालेली मुलगी मध्यप्रदेशमधून ताब्यात

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 10:23PMदोडामार्ग : वार्ताहर

दीड-दोन महिन्यांपूर्वी साटेली येथून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी  व संशयीत आरोपी यांना मध्यप्रदेश येथील एका खेडेगावातून ताब्यात घेण्यात आले.   तब्बल दोन महिन्यांनी मुलीचा शोध लागल्याने  कुटुंबियांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

याबाबतची तक्रार तिच्या आईने दोडामार्ग पोलिसात दिली होती. तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत संशयित परप्रांतिय युवकाचे नावही तिने पोलिसांकडे दिले होते.  गेले दोन महिने पोलिसांकडून गतीने तपास होत नसल्याने कुटुंबियांनी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान सदर मुलगी मध्यप्रदेश राज्यातील एका खेडेगावात असल्याची माहिती मिळताच दोन दिवसा पूर्वी दोडामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गोते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले होते. त्यांच्या सोबत  मुलीचे वडीलही  गेले होते, रविवारी हे पथक या दोघांना घेऊन दोडामार्गात  दाखल झाले.

आज उपोषण करणारच! 

मुलीचा शोध घेण्यास पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत अपहत मुलीच्या कुटुंबियांनी सोमवार 9 जुलै पासून दोडामार्ग पोलिस स्थानकासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. जोपर्यंत पोलिस मुलीला आपल्या ताब्यात देत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचे मुलीच्या आईने सांगितले.