Fri, Mar 22, 2019 00:21
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’चा रिफायनरीविरोधात मोर्चा

‘स्वाभिमान’चा रिफायनरीविरोधात मोर्चा

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:04PMदेवगड : प्रतिनिधी

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात कुठलाही अधिकारी देवगडमध्ये आला तर तो परत जाणार नाही.कोकणाकडे वाकडया नजरेने आता कुणीही पाहू नका कोकणी जनता आता सहन करणार नाही.लोकांच्या विरोधात जाऊन प्रकल्प लादला तर आम्ही कायदा बघणार नाही, कितीही पोलिस संरक्षण दया किंवा सैनिकांना उभे करा, आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही,असा एल्गार आ.नितेश राणे यांनी दिला.

ग्रीन रिफायरीच्या विरोधात आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान पक्ष कार्यकर्ते व नाणार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी शुक्रवारी देवगड तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा  काढला. तहसीलदार वनिता पाटील यांना या ग्रीन रिफायनरी प्रकल्प विरोधात निवेदन देण्यात आले. स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा महिला अध्यक्ष प्रणिता पाताडे,स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली,संदीप साटम,बाळा खडपे,अ‍ॅड.अविनाश माणगावकर, पं. स. सदस्य रवी पाळेकर, जि. प. सदस्या सावी लोके , ग्रीन रिफायनरी रामेश्‍वर गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, मुनाफ ठाकुर, संजय बोंबडी,भाई नरे, रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, माजी सभापती रवींद्र जोगल,पं. स. सदस्या शुभा कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश राणे आदी स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व गिर्ये रामेश्‍वर गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

आ. नितेश राणे म्हणाले, आमची भूमिका शिवसेनेसारखी बदलणारी नाही. आम्ही एखादया विषयाच्या भूमिकेवर ठाम असतो.  खा. विनायक राऊ त,आ.  राजन साळवी, प्रमोद जठार या विकले जाणार्‍या व्यक्‍ती आहेत. त्यांना कोकणी जनतेच्या समस्येविषयी व भावनेविषयी कोणताही आदर नाही. मात्र, राणे कुटुंबीयांना कोणीही विकत घेऊ शकत नाही. रिफायनरी प्रकल्पासाठी लागणा-या धरणासाठी राजापूर तालुक्यातील 14 गावे व देवगड तालुक्यातील गिर्ये- रामेश्‍वरमधील दोन गावे मिळून देवगड तालुक्यातील व खारेपाटण परिसरातील आणखीन पंधरा गावे घेण्यासाठी काही छुप्या पध्दतीने सर्वे केला जात असल्याचा दावा आ. राणे यांनी केला. मात्र, कितीही छुप्या पध्दतीने सर्वे केला, तरी या ठिकाणी हा विनाशकारी प्रकल्प आपण  होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.  

ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्ये आणण्यासाठी सर्वप्रथम खा. विनायक राऊत यांनी प्रयत्न केले.हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर देखील केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांवरती हक्‍कभंगांची कारवाई करणार असल्याचे खा. विनायक राऊ त यांनी सांगितले होते. मग राऊ त यांनी हक्‍कभंगाची कारवाई मुख्यमंत्र्यावरती का केली नाही? असा सवाल करत यावरुन मुख्यमंत्री बोलले हे खरे होते, असा टोला त्यांनी खा. राऊतांना लगावला.

देवगड तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही रिफायनरी प्रकल्प रदद होण्यासाठी निवेदन देत आहोत. प्रशासनाने रिफायनरी प्रकल्पा रेटण्याचा प्रयत्न केल्यास या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. प्रशासनाने पोलीस नव्हे तर आर्मीचे बळ वापरले तरी त्यांना पहिले सामोरे जाणारा नितेश राणे असेल.आमची सहनशिलता  संपली आहे. यापुढील आपली संघर्षाची लढाई दिसून येईल, असा इशारा आ. राणे यांनी दिला. रामेश्‍वर गावचे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर,तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी प्रकल्पाच्या विरोधात  विचार मांडले.

नाणार विरोधी घोषणांनी दुमदुमले देवगड 

आ.नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड स्वाभिमान कार्यालयातून देवगड तहसिलदार कार्यालयावरती धडक मोर्चा जात असताना तमाम मोर्चामधील जनतेमधून नीतेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,रिफायनरी हटवा कोकण वाचवा,एकच जिध्द रिफायनरी रदद,जमिन आमच्या हक्‍काची नाही कुणाच्या बापाची,कोकणचा कसाई सुभाष देसाई अशा घोषणांनी देवगड परिसर दुमदुमुन गेले होते.