Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Konkan › सत्तरीतल्या दाम्पत्याने खोदली चक्‍क विहीर!

सत्तरीतल्या दाम्पत्याने खोदली चक्‍क विहीर!

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:49PMराजापूर : प्रतिनिधी

माणसाच्या अंगी जिद्द असेल तर तो कोणत्याही वयोगटातील असेना, त्यावर मात करून तो आपले ध्येय  साध्य करतो हे अनेकदा सिध्द झाले आहे. त्याचेच एक उदाहरण राजापूरमध्येे दिसून आले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  सत्तरीतील दाम्पत्याने मेहनत घेतली आणि सुमारे सोळा ते सतरा फुटाची विहीर खोदली आणि त्याला पाणीही लागले. रायपाटणच्या सुतारवाडीतील पांचाळ दाम्पत्याच्या कार्याची चर्चा आदर्शवत ठरू लागली आहे.

पाण्यासाठी माणसाला दाहीदिशा धावाधाव करावी लागते. मग ते पाणी  पिण्यासाठी, भातशेतीसाठी किंवा फळझाडांसाठी असेल. पाण्यासाठी भटकंती कोकणात काही टळत नाही.  अशीच पाण्यासाठी धावाधाव रायपाटण सुतारवाडीतील शशिकांत  पांचाळ व त्यांची पत्नी शशिकला पांचाळ यांना करावी लागत होती. त्यांच्या घराजवळ विविध झाडे लावण्यात आली आहेत. या फळझाडांच्या बागेला पाणी घालण्यासाठी खास अशी पाण्याची सोय तेथे नव्हती. घराकडूनच त्यांना डोक्याने पाण्याचे हंडे न्यावे लागायचे.तेव्हा कुठे त्या झाडांना पाणी मिळायचे. शशिकांत व त्यांची पत्नी यांना उतरत्या वयात झाडांना पाणी नेताना त्रास होत होता. सातत्याने येत असलेल्या अडचणी कायमच्या दूर करण्यासाठी अखेर या पती-पत्नीने यावर उपाय शोधला व बागेत असलेल्या एका कोपर्‍यात विहीर खणण्याचा निर्णय घेतला. 
या वृद्ध दाम्पत्याने उतरत्या वयातही मेहनत घेत, न थकता व नाउमेद न होता सुमारे सोळा ते सतरा फुटांचे खोदकाम केले. या दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याची पर्वा न करता हाती घेतलेले काम त्यांनी चालूच ठेवले. अखेर त्यांच्या श्रमाचे चीज झाले व पाण्याचा झरा सापडला. 

आपल्या श्रमाला यश आल्याचे पाहून पांचाळ दाम्पत्य आनंदून गेले. त्यांनी आणखी खोदकाम केले. त्यानंतर विहिरीतील पाण्याची पातळी दोन फुटांची झाली आहे. आजच्या गतिमान युगात विहीर खोदण्यासाठी मशिनरीचा वापर केला जातो. असे असताना दुसरीकडे सत्तरीतील दाम्पत्याने चक्क स्वत:च्या घाम गाळून सोळा ते सतरा फुटांची विहीर खोदली. ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. पांचाळ दाम्पत्याने श्रमदानातून खोदलेल्या विहिरीला पाणी लागल्यानंतर अनेकांनी त्या विहिरीला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.