Thu, Apr 25, 2019 15:46होमपेज › Konkan › चालत्या कारवर कोसळला ट्रक

चालत्या कारवर कोसळला ट्रक

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 10:11PMवैभववाडी : प्रतिनिधी
रस्त्यावरच्या खड्ड्यात आदळून मालवाहक ट्रक बाजूने जाणार्‍या कारवर उलटला. या विचित्र अपघातात ट्रकखाली सापडून कारचा चक्‍काचूर झाला. कारमधील चौघांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले; परंतु कारचालक कारमध्ये अडकून पडला होता. दोन जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने नागरिक व पोलिसांना कारचालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तब्बल दोन तास झुंज देत तो मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. हा भीषण अपघात वैभववाडी-गगनबावडा मार्गावर एडगाव रामेश्‍वर मंदिरानजीक सोमवारी रात्री 10 वा. सुमारास घडला. नागरिक व पोलिस कर्मचारी यांनी दाखविलेल्या समयसूचक मदतीमुळे या कर्नाकटातील पाच युवकांना जीवदान मिळाले आहे. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्हीही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूरहून कुडाळ-माणगांव येथे पशुखाद्य भरलेला मालवाहक ट्रक चालक प्रकाश शंकर पाटील (रा.सोनीपाटगांव-मिरज) हा जात होता.  तर कार चालक महम्मद समीर हुसेन (22 रा. कर्नाटक) हा सहकार्‍यांसह गोव्याहून कोल्हापूर मार्गे मुंबईला जात होता. ही दोन्ही वाहने एडगाव- रामेश्‍वर मंदिर नजिक आली असता  रस्त्यावरील खड्ड्यात आदळून ट्रक थेट चालत्या कारवरच पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकून पडलेल्या चार युवकांना बाहेर काढले. फरहान मुनावर (22), आमीर जुन्‍नेद (20), महम्मद मुबारक गौसपीट (22, सर्व रा. कर्नाटक) अशी या युवकांची नावे आहेत.
 

मात्र कारचालक कारमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, ठेकेदार सुनील रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांनी आपले जेसीबी बोलावून ट्रक उचलण्याचा प्रयत्न केला.  मात्र ट्रक पशुखाद्य पोत्यांनी भरलेला होता. पलटी झालेल्या ट्रकला एका बाजूने जेसीबीने टेकू दिला. तर दुसर्‍या बाजूने ट्रकला ओढून धरुन ठेवला.  तरीही कारमध्ये अडकलेल्या तरुणांना काढता येत नव्हते. अखेर तळेरे येथून फोन करुन क्रेन बोलावण्यात आली. दरम्यान नागरिक व पोलिस कर्मचार्‍यांनी ट्रकमधील खाद्याची पोती उतरुन ट्रक रिकामी केला. क्रेन आल्यानंतर अलगद क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करुन कारमध्ये अडकलेल्या कार चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाचा एक हात व पाय कारमध्ये अडकले होते. नागरिकांनी कारचा पत्रा पेचून काढत त्याला बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली होती. अपघातस्थळी रुग्णवाहिका व डॉक्टरही हजर होते. त्या सर्वांवर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी जिल्हा बँक  संचालक गुलाबराव चव्हाण, नगरसेवक संतोष पवार, मारूती मोहिते, विवेक रावराणे, रणजित तावडे, अनिकेत माईणकर, संतोष यादव, साळवी, रोहीत रावराणे , जगदीश चव्हाण, गणेश मोहीते. यांच्यासह एडगांव व वाभवे येथील अनेक तरुण  धावले. पोलिस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, पो.हे.कॉ.खेडेकर, कॉ.तळेकर चालक कदम यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी मदतकार्य केले. हे सर्व तरुण कर्नाटकहून गोवा, गोवा ते पुणेमार्गे मुंबई असे पर्यटनासाठी जात होते.  सुदैवाने या तरुणांचा जीव वाचल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला.