Tue, Apr 23, 2019 20:18होमपेज › Konkan › ११६८ पैकी १०१९ फेर्‍या रद्द; कुडाळ तालुक्यात दोन एस.टीं.वर दगडफेक

एस.टी.चे ९५ टक्के कर्मचारी संपावर

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:09PMकणकवली : शहर वार्ताहर 

महाराष्ट्र परिवहन विभागातील कर्मचार्‍यांसाठी  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटना व कर्मचार्‍यांना विश्‍वासात न घेता थेट पगारवाढ जाहीर केली़ ही पगारवाढ म्हणजे कामगारांची फसवणूक आहे, अशी भावना कामगार वर्गामध्ये निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले 95 टक्के कर्मचारी संपावर गेले़  जिल्ह्यातील 1168 फेर्‍यांपैकी 1099 फेर्‍या  रद्द झाल्याने एस.टी. प्रशासनाला मोठा फटका बसला़  केवळ 69 फेर्‍या  गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़  अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र सर्वत्र होते़. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांत शुकशुकाट होता. दरम्यान, कुडाळ तालुक्यात नेरूर व भडगाव येथे दोन एस.टी. गाड्यांवर अज्ञातांनी दगडफेक केल्याने गाड्यांच्या काचा फुटून किरकोळ नुकसान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारातून दररोज ग्रामीण व बाहेरगावी  जाणार्‍या  1168 हून अधिक फेर्‍या सुरू आहेत़  परिवहन विभागाच्यावतीने केलेल्या एकतर्फी पगारवाढीविरोधात अचानक कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला़ या संपात कामगार संघटनांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे़. त्याचबरोबर हा संप शनिवारी किंवा पुढील कालावधीत सुरू असणार याबाबत कोणतीही माहिती संघटना, कर्मचारी किंवा प्रशासनाकडून प्राप्त झाली नाही़ परिवहन विभागाच्या आगारातील कर्मचारी, दुरूस्ती विभागातील कर्मचारी व चालक वाहक या संपात सहभागी झाले होते़ कामगार संघटना व इंटक संघटनेसह अन्य कामगार संघटनांचा या संपात सहभाग दिसून आला़ केवळ शिवसेनाप्रणीत एस.टी. कामगार संघटनेच्या सभासदांनी कामावर हजर राहून काम करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र होते़ 

जिल्ह्यातील  69 फेर्‍या सायंकाळी 5 वा. पर्यंत रवाना झाल्या होत्या. त्यापैकी कणकवली- फोंडाघाट बस फोंडा येथे पोहोचली असता एस.टी. कामगारांनी अडवली़  त्याच ठिकाणी बसच्या चाकातील हवा काढून टाकण्यात आली़  हवा काढल्यामुळे चालकाने संबंधित कर्मचार्‍यांविरोधात अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दिली आहे़. 

दरम्यान, या संपामुळे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र होते़  अचानक झालेल्या संपाचा परिणाम जनजीवनावर दिसून आला़ त्यामुळे खासगी वाहनांना प्रवाशांचे मोठे भारमान दिवसभर मिळाले़  सहा सिटर, मॅजिक, तीन आसनी रिक्षा व अन्य खासगी वाहनांना प्रवाशांनी पसंती दिली़ सर्वसामान्य नागरिकांना एस.टी. कामगारांच्या संपाचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे़ संपाबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती़ 

खासगी वाहतुकीस परवानगी  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांकरिता गुरुवार 7 जून 2018 रोजीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप/आंदोलन पुकारले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये शिवाय  प्रस्तावित संप/आंदोलनाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोटार वाहने अधिनियम 1988 (1988 चा 59) चे कलम 66 चे उपकलम (3) चा खंड (एन) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यातील सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कुल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेसे व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तावित संप/आंदोलन ज्यावेळी मागे घेतले जाईल त्यावेळेपासून अधिसूचना रद्द करण्यात येईल, असे समजण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.