Wed, Nov 14, 2018 22:59



होमपेज › Konkan › कोयनेत 94 टीएमसी पाणी

कोयनेत 94 टीएमसी पाणी

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:08PM

बुकमार्क करा




रत्नागिरी : प्रतिनिधी

जानेवारीपर्यंत सातार्‍यातील कोयना धरणात तब्बल 94  टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. तांत्रिक महिन्यांपैकी पाच महिन्यांसाठी वीजनिर्मितीसह सिंचनासाठीही हा पाणीसाठा दिलासा देणारा आहे. या पाणीसाठ्यामुळे वीज निर्मितीसह व सिंचनाची चिंता मिटली आहे. मात्र, मुबलक पाणी उपलब्ध असतानाही कमी पाणीवापर व त्याचपटीत कमी वीज निर्मिती यामुळे महसूली तोटा मात्र सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. दरवर्षी विजेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला कोयना धरण तारते. सिंचन आणि वीजनिर्मिती यासाठी कोयना धरण महाराष्ट्राला वरदान लाभले आहे. कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे असे असते. कॅलेंडर वर्षामुळे या तांत्रिक वर्षापैकी सात महिन्यांचा कालावधी संपला आहे. या काळात पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पैकी केवळ 26.04 टीएमसी पाणीवापर झाला आहे. वीज निर्मितीला पाच महिन्यांसाठी 41.46 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या शिल्लक कोट्यामुळे वीज निर्मितीची चिंता निदान या प्रकल्पापुरती तरी मिटली आहे. सिंचनाची गरज वाढत चालल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून आहे. जवळपास 35 टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरण्यात आले. आत्तापर्यंत यासाठी 6.39 टीएमसी  पाणीवापर झाला आहे.

त्यामुळे आगामी काळात सुमारे 29 टीएमसीची गरज भागविणेही शक्य आहे. त्यामुळे आता एकूण 94 टीएमसी  शिल्लक कोट्यापैकी पश्‍चिमेकडील  वीज निर्मितीसाठी 41, सिंचनासाठी 29 व मृतसाठा 5 अशा 75 टीएमसी पाण्यानंतरही आगामी तांत्रिक वर्षाच्या सुरूवातीला 19 हून अधिक टीएमसी  पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सर्वसामान्यांनासह उद्योजकांनाही हा दिलासा ठरणार आहे. ज्यादा पाणीसाठा शिल्लक असला तरी गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीवापर झाल्याने तब्बल 555 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झाल्याने त्यातून राज्याला अब्जावधींच्या महसुली तोट्यालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र पाण्याचा नियोजनबध्द वापर झाला तर तोटा भरून निघेल.
धरणातील एकूण 105 टीएमसी पाण्यापैकी पश्‍चिमेकडील जलविद्युत प्रकल्पांसाठी 67.50 टीएमसी आरक्षित पाण्यावरच वीजनिर्मिती होत आहे.